नंदुरबार। देहविक्री करणार्या महिलांच्या दुनियेत अल्पवयीन मुलींनाही ढकलले जात असल्याची बाब वारंवार समोर येत असल्याने दलालांच्या माध्यमातून जिल्ह्यात सेक्स रॅकेट सुरू असल्याचे शहादा येथे टाकण्यात आलेल्या धाडीतून उघडकीस आले आहे. भाजीमार्केट लगत असलेल्या रेडलाईट परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा नंदुरबार पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या कारवाईत 9 महिला एजंटांसह आठ पिडीत महिलांना ताब्यात घेवून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. विशेष म्हणजे याच भागात तीन महिन्यापूर्वी देहविक्री करणार्या 72 पीडित महिलांना पकडण्यात आले होते. त्यात काही अल्पवयीन मुलींचाही समावेश होता. ही घटना ताजी असतांनाच पुन्हा त्याच शहरात देहविक्री करणार्या अशा घटनांमुळे एक सामाजिक प्रश्न निर्माण होवू पाहत आहे. दलालांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या सारख्या घटनेने तालुक्याचे ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक परंपरेची वल्गना करणार्यांना चांगलीच चपराक बसली आहे. शहादा शहर म्हणजे नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळख आहे. या शहरातील शैक्षणिक स्थिती सर्वांनाच परिचीत आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून या शहराचे नाव कमालीचे बदनाम होतांन दिसत आहे. या छोट्या शहरात चक्क 72 महिला वेश्या व्यवसाय करीत होत्या. यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. परंतु जेव्हा या भागात पोलिसांनी छापा टाकला तेव्हा छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या व्यवसायाचे सत्य उघड झाले. त्यात म्हणजे अल्पवयीन मुलींचाही सहभाग असणे हा सामाजिक प्रश्न वेगळाच.
नुकतीच केली आहे कारवाई
आर्थिक मजबुरीचा फायदा घेत काही दलालांंनी अशा अल्पवयीन मुलींना या व्यवसायात ढकलले असल्याची बाब आता समोर येत आहे. दोन दिवसापूर्वीच नंदुरबारचे अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या पथकाने भाजीमार्केट परिसरातील रेड लाईटमध्ये छापा टाकून 9 महिला एजंटांसह 8 पिडित महिलांना ताब्यात घेतले आहे. यावेळी त्यांच्याकडून 76 हजार रूपये रोख व काही मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत. यावेळी त्यांच्याकडून 76 हजार रूपये रोख व काही मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत. याच मोबाईलच्या माध्यमातून दलालांची व संबंधीत आंबटशौकीन ग्राहकांची माहिती समोर येवू शकते, पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्याची आवशकता आहे. प्राप्त माहितीनुसार शहादा हे शहर गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सिमेला जोडणारे आहे.
हा व्यवसाय केवळ शहाद्यातच आहे असे नाही, नंदुरबारसारख्या शहीदांच्या भूमितही याचा बोलबाला आहे. फरक एवढा आहे की रेडलाईट एरियाऐवजी हा व्यवसायात उच्चभ्रू वसाहतीत असतो. म्हणून सामाजिक प्रश्न बनलेल्या या प्रकाराला हद्दपार करण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.
परराज्यातील ग्राहक
या ठिकाणी परराज्यातील मुलींसह ग्राहक येत असतात.या व्यवसायाला दलालांच्या संरक्षण असल्याने त्यांचे चांगलेच फावते. असे असले तरी सामाजिक संघटना, राजकीय पुढारी यावर आवाज उठवित नाही ही शोकांतिका असल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटून येत आहे. एका वर्षात तिनदा छापा टाकूनही पुन्हा हा व्यवसाय सुरू ठेवण्याची हिंमत कुणाच्या बळावर केली जाते, याचाही शोध घेणे गरजेचे झाले आहे.