जिल्ह्यात पंचायत समित्यांवर भाजपाचा वरचष्मा

0

आठ ठिकाणी सभापती शिवसेना दुसर्‍या क्रमांकावर

जळगाव – जिल्ह्यात गुरुवारी (दि.२) झालेल्या पंचायत समिती सभापती निवडीत भाजपाचाच वरचष्मा दिसून आला आहे. आठ ठिकाणी शतप्रतिशत भाजपाचे सभापती व उपसभापती निवडून आले आहे. तर शिवसेना तीन ठिकाणी आणि अन्य दोन ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आघाडी करून सेनेचे सभापती निवडून आले आहे. तर राष्ट्रवादीनेही भाजपासोबत आघाडी करून दोन ठिकाणी सभापती पद पदरात पाडून घेतले. जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेनंतर सभापती व उपसभापती पदाचे कारभारी निवडणूक अधिकार्‍यांनी जाहीर केले. यात भुसावळ, यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर, अमळनेर, पाचोरा आणि जामनेर या आठ ठिकाणी शतप्रतिशत भाजपाचे सभापती उपसभापती निवडून आले आहे.

जळगाव, धरणगाव आणि एरंडोल या तीन ठिकाणी शिवसेनेचेच सभापती, उपसभापती निवडून आले आहे. तर पारोळा आणि भडगाव येथे शिवसेनेचे सभापती तर उपसभापती राष्ट्रवादीचे निवडुन आले आहे. चाळीसगा आणि चोपडा येथे सभापती राष्ट्रवादीचे तर उपसभापती भाजपाचे निवडुन आले. पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या या निवडणुकीत भाजपाचाच वरचष्मा दिसून आला आहे.

आज अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 3 जानेवारी रोजी, निवडणूक होत आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून केला जात आहे. परंतु, काँग्रेसचे चार सदस्य हे भाजपासोबतच असल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतो अथवा नाही याकडे लक्ष लागले आहे.