36 संवेदनशील केंद्रासह सर्वच केंद्रावर प्रशासनाची राहणार करडी नजर ; मुंबई, पुणे, नाशिक, धुळे व गुजरात येथीलही कर्मचारी, अधिकार्यांचा बंदोबस्तात सहभाग
जळगाव- जिल्ह्यात 11 मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 36 मतदान केंद्र संवेदनशील असून त्यात सर्वाधिक 11 केंद्र भुसावळ शहरात आहेत. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दिल्ली येथून केंद्राचा विशेष पोलीस फोर्सही मागविण्यात आला आहे. या फोर्समध्ये 11 कंपन्या असून एका कंपनीत 120 कर्मचार्यांचा समावेश आहे. दिल्लीचे 1 हजार 320 कर्मचारी त्याशिवाय आरसीपी, सीआरपीएफ, स्ट्रायकिंग फोर्स असा जिल्ह्यातील साडे तीन हजार पोलिसांव्यतिरिक्त बाहेरुन साडे चार हजार पोलीस कर्मचार्यांचा बंदोबस्त राहणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक धुळे व गुजरात येथूनही बंदोबस्त मागविण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बंदोबस्ताचा अंतिम आराखडा तयार करण्याचे काम सुरु होते.
रविवारी नियुक्तीच्या ठिकाणी पोहचणार
शुक्रवारी वरिष्ठ अधिकार्यांनी व्हीडीओकॉन्फरन्सद्वारे जिल्ह्याचा आढावा घेतला. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्ह्यातील साडे तीन हजार पोलिसांव्यतिरिक्त बाहेरुन साडे चार हजार पोलीस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. त्यात एसआरपीएफ, रॅपीड अॅक्शन फोर्स, आरसीपी प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, क्युआरटी व होमगार्ड यांचा समावेश राहणार आहे. गुजरातमधून गोध्रा येथून होमगार्डचे 8 अधिकारी व 400 कर्मचारीही बोलाविण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळी बंदोबस्ताचे वाटप झाल्यानंतर रविवारी हे अधिकारी, कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी पोहचतील. पोलीस मुख्यालय, नियंत्रण कक्ष व जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचार्यांचा बंदोबस्त आहे.
मुंबई लोहमार्गचे कर्मचारी दाखल
या निवडणुकीसाठी मुंबई लोहमार्गचे 400 कर्मचारी व गोध्रा पंचमहल येथील 400 होमगार्ड यांची विधानसभा मतदारसंघानिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातून 10 पोलीस निरीक्षक, महिला उपनिरीक्षक, प्रशिक्षणार्थी 100 महिला पोलीस, नाशिक येथून परिविक्षाधीन 3 पोलीस उपअधीक्षक, 30 उपनिरीक्षक, पुणे पीसीआरचे 6 पथके यासह जवळच्या जिल्ह्यातूनही बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
असा आहे बाहेरील बंदोबस्त
मुंबई लोहमार्ग : 400 कर्मचारी
पीटीएस धुळे : 10 निरीक्षक
पीटीएस धुळे : 100 महिला कर्मचारी
नाशिक : 3 परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक
नाशिक : 30 उपनिरीक्षक महिला
गोध्रा पंचमहल : 400 होमगार्ड
दिल्लीचा फोर्स : 11 कंपन्या