जिल्ह्यात भूजल पातळी वाढीसाठी बोअरवेल जलपुनर्भरण

0

नंदुरबार। डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड यांच्यावतीने पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने नंदुरबार शहर व जिल्ह्यात विहीर बोअरवेलचे जलपुनर्भरण उपक्रम राबविला गेला. प्रतिष्ठानच्या सदस्यांच्यावतीने घराजवळील, शेतातील बोअरवेल, विहीर यांचे जलपुनर्भरण केले. घराच्या छतावरील पावसाचे वाहून जाणारे पाणी सँड फिल्टरद्वारे बोअरवेल व विहिरीमध्ये सोडल्यास भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते. नंदुरबार शहरातील सर्व खाजगी हॉस्पीटल, ग्रामपंचायत कार्यालय, कॉलनी परिसर येथेही जलपुनर्भरण करण्यात आले. सदर प्रतिष्ठानच्या या सामाजिक कार्याची दखल घेत एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांचे बोअरवेल जलपुनर्भरण प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाने करण्याचे आदेश दिले.

132 बोअरवेल जलपुनर्भरण
ग्रामपंचायत होळतर्फे हवेली यांनी सुद्धा कार्याची दखल घेत ग्रामपंचायत मालकीचे बोअरवेल जलपुनर्भरण करुन समस्त ग्रामस्थांना प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाने घराजवळील बोअरवेल जलपुनर्भरण करण्याचे आवाहन करुन जलपुनर्भरण केले. ज्या ग्रामस्थांनी जलपुनर्भरण केले. त्यांना मालमत्ता करात सुट देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानतर्फे एकुण 132 बोअरवेल/विहीर जलपुनर्भरण करण्यात आले. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, रक्तदान शिबिर, गरीब मुलामुलींना शालेय साहित्य वाटप तसेच स्वच्छता अभियान, जलपुनर्भरण असे विविध उपक्रम दरवर्षी राबविले जातात.