जळगाव । शेतकर्यांना संपुर्ण कर्जमाफी मिळावी यासंह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकर्यांनी इतिहासात पहिल्यांदा 1 जून पासून संप पुकारला आहे. शेतकरी संपामुळे सोमवारी 5 रोजी संपुर्ण महाराष्ट्र बंदचा हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदला जळगाव जिल्ह्यात या संपाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याभरात रास्ता रोको, पुतळा दहन, भाजीपाल, दुध फेकुन देण्यात आले. बंदमुळे अनेक ठिकाणी आठवडे बाजार असतांनाही कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व पक्षीय पक्ष व संघटनांनी बंदला पाठिंबा दिला. व्यापारी व उद्योजकांनी देखील बंदला पाठिंबा देत दुकाने बंद ठेवली.
शिवसेनेचा रास्ता रोको यशस्वी
पाचोरा । पाचोर्यात महाराष्ट्र बंदला पाचोरा शहरात कडकडीत बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे. तसेच भडगाव रोड, स्टेशन रोड, जामनेर रोड, सराफ बाजार संपूर्णपणे बंद होती. अत्यावश्यक सेवा डॉक्टर्स, दवाखाने व मेडिकल दुकाने सुरु होती. शिवसेना आयोजित पाचोरा-भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या समर्थनार्थ रास्तारोको करण्यात आला. रस्त्यावर दुध, टमाटे, टरबूज, कांदे, बटाटे, भेंडी, लिंबू, वांगे, मिरची यासह सर्व शेतमाल रस्त्यावर फेकण्यात आला. त्यावेळेस आ.किशोर अप्पा पाटील यांच्यासह जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसींग राजपूत, पद्मसिंग पाटील हे जि.प.चे सदस्य व भाजप नगराध्यक्ष संजय गोहील, माजी आमदार आर.ओ.तात्या, किशोर बारावकर, गणेश पाटील, पप्पु राजपूत, जितू पेंढारकर, शरद पाटे, आनंद पगारे, दिपक पाटील, वैभव राजपूत, विजू भोई यांच्या असंख्य कार्यकर्ते व शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये त्यांनी शेतकर्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, सात बारा सरसकट कोरा करा, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पाचोर्याचे तहसिलदार कापसे यांना शेतकर्यांच्या कर्जमाफीचे निवेदन देण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. उपविभागीय अधिकारी केशव पातोंड, पाचोर्याचे पी.आय. पिंपळगावचे संदीप पाटील, अविनाश आंधळे यांच्यासह पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त होता. रास्ता रोकोनंतर लगेचच महाराणा प्रताप चौकात शेतकर्यांकडून वीज कर्जमुक्त होणारच असे फॉर्म शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी भरुन घेतले.
पाचोर्यात महाराष्ट्र बंदला सर्वपक्षीयांचा पाठिंबा
पाचोरा । पाचोर्यात महाराष्ट्र बंद ला पाचोरा शहरात कडकडीत बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे. आज सकाळपासून भाजीपाला मार्केट पूर्णपणे बंद होती. त्यामुळे भाजी मंडी सामसून होती. किसान क्रांती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पाचोरा तालुका व्यापारी महामंडळ, पाचोरा तालुका सराफ असोसिएशन, शेतकरी संघटना, भाजीपाला व फळ विक्रेते संघटना, रिक्षा युनियन, फर्टिलाइजर कृषी सेवा केंद्र, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय शेतकरी संघटना, सिंधी असोसिएशन, श्री संत नाभिक मंडळ, जय मल्हार सामाजिक संघटना आदी संघटना सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वाघ, किसान क्रांती सचिन सोमवंशी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अॅड अविनाश भालेराव, साहेबराव पाटील, संगीता नेवे, क्रांती पाटील शकिल शेख, मुल्ला, दिगंबर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चेनगरसेवक विकास पाटील, अॅड दिपक पाटील,रणजित पाटील, प्रकाश भोसले, सतीश चौधरी, अरुण पाटील, अनिल पाटील, संभाजी ब्रिगेड रविंद्र पाटील, राजेंद्र पाटील, अनिल पाटील,गणेश पाटील, मराठा सेवा संघाचे मंगेश पाटील, धाकलु पाटील, परमेश्वर पाटील, अ.भा माळी महासंघाचे अनिल महाजन, अ.भा. महाराष्ट्र पत्रकार संघाचे किशोर रायसाकडा, सचिन पाटील, धनराज पाटील, गणेश शिंदे, विशाल हटकर, कुणाल पाटील, सागर महाजन, सतीश पाटील, किरण राठोड, गणेश देवरे, प्रवीण पाटील, आनंद संघवी, राजेंद्र बोथरा, भावडु पाटील,अॅड. अविनाश सुतार, आबा येवले सुदय शेलार आदी उपस्थित होते.
शेंदुर्णी येथे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद
शेंदुर्णी। गेल्या 4 दिवसापासून राज्यातील शेतकरी आपल्या सरसकट संपूर्ण कर्जाची माफी, सातबारा कोरा करून घेण्यासाठी, तसेच स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी, शेतमालाला खर्च आधारित हमीभाव व इतरही मागण्या मान्य करून घेण्यासाठी बेमुदत संपावर गेला असून संपकर्याच्या एका गटाशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संप मिटल्याचे जाहीर केले परंतु शेतकर्यांना ते मान्य नाही म्हणून सोमवारी 5 रोजी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. शेंदुर्णी येथे बंदला शंभर टक्केप्रतिसाद मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेस, कांग्रेस, शेतकरी संघटनेचे वतीने येथील पहूर दरवाज्यात भाजीपाला, फळे, दूध रस्त्यावर फेकून युती सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान रास्ता रोको करून सरकार विरोधी घोषणाबाजी करत एक तास वाहने अडवून मागण्यांचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, पंचायत समिती सदस्य डॉ किरण सूर्यवंशी, सागरमल जैन, माजी पंचायत समिती सभापती किशोर पाटील, सुधाकर बारी, शांताराम गुजर शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते. त्रिविक्रम महिला डेअरी, कमल डेअरीला व खाजगी डेअरींनी दूध पुरवठा केला नाही तर व्यापारी असोसिएशनने शेतकरी संपास संपूर्ण पाठींबा देत दिवसभर आपली दुकाने बंद ठेवली. यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी अमळनेरात ठिय्या
अमळनेर। संपुर्ण कर्जमाफी व्हावी, शेती मालाला हमी भाव मिळावा, सात बारा कोरा व्हावा, विज बिल माफ करण्यात यावे यासंह विविध मागण्यासाठी राज्यातील शेतकर्यांनी 1 जून पासून संप पुकारला आहे. संप कालावधीत शेतकरी भाजीपाला व दुध फेकुन देत असून शासनाचा निषेध करत आहे. शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभा व शेतकरी कृती समितीतर्फे तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर ठिय्या मांडण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. खोटी व अन्यायकारक वीजबिल माफ करून गुजरात राज्याप्रमाणे विजबिल आकारण्यात यावे, हमी भावाबाबत शासनाने कायदा करावा, शेतकर्यांना पेंशन योजना लागू करून शेतकर्यांच्या मुलांना मोफत उच्च शिक्षण मिळावे अशी मागणीही यावेळी शेतकर्यांनी केली. यावेळी प्रा.शिवाजीराव पाटील, अरुण देशमुख जी.एन.सूर्यवंशी, हिरालाल पाटील, सलीम मेवाती, विजय गाडे, संजय कापडे, गुलाम रसूल, मिलिंद निकम संजय पाटील, धनगर पाटील, गोकुळ बोरसे, मिलींद बोरसे,गिरीश पाटील,राजेंद्र पवार, रविंद्र पाटील, लोटन पाटील, गोपाळ पाटील, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, लक्ष्मण शिंदे, प्रदीप पाटील, रामलाल पाटील, दिलीपसिग पाटील, नरेंद्र बाळू पाटील यांच्या शेतकरी उपस्थित होते.
एरंडोलमध्ये महाराष्ट्र बंदला प्रतिसाद नाही, सर्व व्यवहार सुरळीत
एरंडोल। राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्रात शेतकरी संप पुकारला आहे. संपामुळे सोमवारी 5 रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यासह जिल्ह्यासह महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत आहे. मात्र एरंडोल येथे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत नसून शहरातल सर्व व्यवहार नेहमी प्रमाणे सुरळीत सुरु आहे. यापूर्वी देखील शेतकर्यांच्या राज्यव्यापी संपाचा शहरात कोणताही परिणाम झालेला नाही. शेतकरी संप व महाराष्ट्र बंदला विविध राजकीय पक्षांनी पाठींबा दिला होता. मात्र शहरात बंदला प्रतिसाद मिळाला नाही. सकाळपासुनच शहरातील सर्व व्यवसायिक दुकाने, किराणा दुकाने, वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु होती. मात्र शेतकरी संपाचा भाजीपाला विक्रीवर परिणाम झाला असून बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. दुध व्यवसायावर काहीही परिणाम झाला नसून दुध पुरवठा सुरळीत सुरु आहे. शेतकरी खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असून कपाशीची लागवड सुरु झाली आहे. ठिंबक संचाद्वारे कपाशीला पाणी भरण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरु आहे. दरम्यान कृषीमालाला हमीभाव देवून शेतकर्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
चाळीसगावात चोख पोलीस बंदोबस्त
चाळीसगाव। संपुर्ण महाराष्ट्रात कर्ज माफीसह विविध मागण्यासाठी 1 जून पासून शेतकर्यांनी संप पुकारला आहे. चाळीसगावातील सर्वपक्षांनी व संघटनांनी या संपाला पाठींबा जाहीर केला आहे. शेतकर्यांच्या मागणीसाठी सोमवार 5 रोजी चाळीसगावात रास्ता रोको करण्यात येत असल्याने शांतता व कायदा अबाधीत रहावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे यांच्या सह पोलीस कर्मचार्यांनी बंदोबस्त ठेवला होता.
नगरदेवळा बंद यशस्वी
नगरदेवळा। लगत असलेल्या 28 खेड्यांची बाजारपेठ आहे. आजुबाजुच्या खेड्यापाड्याला लागुन नगरदेवळा हे एकमेव बाजाराचे ठिकाण आहे. सोमवार हा आठवडे बाजारांचा दिवस आहे या दिवशी मोठी आर्थिक उलाठाल होते. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद दिल्याने या आर्थिक उलाढाल ढप्प झाली. गुरांचा बाजारांचा देखील मोठी उलाढाल होते. मात्र महाराष्ट्र बंदमुळे सर्व बाजार बंद ठेवण्यात आले होते. नगरदेवळा बाजार व मार्केटमधील सर्व व्यापार्यांनी उत्स्फूर्तपणे व्यावसायीक आस्थापने बंद ठेवून शेतकरी संपाला व महाराष्ट्र बंद जोरदार प्रतिसाद दिला. बाजारपेठमध्ये रास्ता रोको करत शेतकर्यांनी भाजीपाला फेकुन दिले. यावेळी पुतळ्याचे दहन करण्यात आले. औरंगाबादहून सुरतकडे जाणारा दूधाचा टँकर अडवून त्यामधील दूध फेकून न देता त्याचे वाटप करण्यात आले. तसे खेड्यावरुन बाजारात विक्रीस आणलेला भाजीपाला रस्त्यावर ओतून देण्यात आला. यावेळी राजेंद्र पवार, मुन्ना परदेशी, मोहन तायडे, विनोद परदेशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.