जळगाव । येत्या 30 मे ते 5 जुन दरम्यान जिल्ह्यात शिवसेनेतर्फे ’भगवा सप्ताह’ राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. या सप्ताहाच्या काळात प्रत्येक तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांच्या कुटूंबियांना प्रत्यक्ष भेटी देवुन तसेच आजच्या स्थितीतील शेतकर्यांच्या समस्या शासन दरबारी निवेदन देवुन मांडण्याचा निर्णय शिवसेनेच्या तालुका प्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पद्मालय विश्रामगृहात शिवसेना तालुका प्रमुखांची बैठक शिवसेना संपर्कप्रमुख रविंद्र मिर्लेकर व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडली.
शेतकर्यांच्या पाठीशी सेना
बैठकीला आमदार किशोर पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ यांच्यासह जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख यांची उपस्थिती होती.बैठकीत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सध्या शेतकरी हवालदील झाला आहे. या बेजार झालेल्या शेतकर्यांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. शेतकर्यांना भेटी देवुन शेतकर्यांच्या व्यथा आणि कथा समजुन घेवुन शासनासमोर मांडणार आहोत असे त्यांनी सांगितले.
सप्ताहातंर्गत तहसीलदारांना निवेदन देवुन शासन दरबारी पाठविणार आहोत. यानंतर जिल्हास्तरावर आंदोलन करण्याबाबत लवकरच एक बैठक शिवसेनेची घेण्यात येणार आहे असे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले. आता लढा शेतकर्यांसाठी आहे असेही बैठकीत सांगण्यात आले. सुत्रसंचालन प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केले. बैठकीला युवा जिल्हायुवाधिकारी प्रितेश ठाकुर, गणेश राणा, गणेश सोनवणे, कुलभूषण पाटील आदी उपस्थित होते.