जळगाव : शनिवारी रात्री नववर्षाचे स्वागत करताना केलेल्या जल्लोषामध्ये मद्यपानामुळे अनेकांचा बेरंग झाला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन केले असल्याने अनेक तळीराम दुचाकी चालवितांना आढळून आले. यात पोलीसांनी केलेल्या ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह मोहिमेमध्ये जिल्ह्यातील 99 मद्यपी वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. पहाटे 3 वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. तर जळगाव शहरात संपूर्ण वर्षभरात विविध 46 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
2016 ला निरोप देताना व वर्ष 2017 चे स्वागत शनिवारी थर्टी फर्स्टच्या रात्री करण्यात आले. हा जल्लोष सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात थर्टी फर्स्टची रात्री मद्यधुंद तरुणाईंकडून दुचाकीवर रपेट मारली जाते. काही अनुचित प्रकार घडु नये, यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे रात्री उशिरापर्यंत खबरदारी म्हणुन बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काव्यरत्नावली, आकाशवाणी, स्वातंत्र्य, टॉवर, भिलपुरा बेंडाळे चौकांसह विविध ठिकाणी बॅरिकेटसह बंदोबस्त लावण्यात आले होते. तसेच जिल्ह्यात 13 चेक पोस्ट नाक्यांसह तालुका स्थरावर चौका चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. यातच मद्य प्राशन करून वाहने न चालवण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. मद्यपी वाहनधारकांसाठी जिल्ह्यासह शहरातील विविध चौकांमध्ये ब्रिथ अॅनालायझरचा वापर करीत ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची मोहिम राबविण्यात आली. या माहिमेमध्ये शहरा वाहतुक शाखेतर्फे 16 मद्यपी वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली तर संपूर्ण जिल्ह्याभरात एकूण 99 मद्यपी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तसेच 2016 मध्ये शहरात बेशिस्त वाहन चालविणे, आवश्यक कागदपत्रे न बाळगणे यांच्यासह वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 46 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.