जिवंत काडतूस व दोन गावठी कट्ट्यांसह टाहकळीचा संशयीत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

भुसावळ : तालुक्यातील टाहकळी येथील संशयीताला जिवंत काडतूस व दोन गावठी कट्ट्यांसह जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे गजाआड केले आहे. सागर प्रकाश ढिके (21, टाहकळी, ता.भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भुसावळसह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कट्टे आढळत असल्याने आता पोलिस प्रशासनाने गावठी कट्टे निर्माण करणार्‍या कारखान्यांवरही समूळ कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेला भुसावळ तालुक्यातील टाहकळी येथील सागर ढिके या तरुणाकडे गावठी कट्टे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने शुक्रवारी दुपारी संशयीताला ताब्यात घेतले. संशयीताच्या अंग झडतीतून 51 हजार रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. शुक्रवार, 25 रोजी पाच वाजेच्या सुमारास टाहकळी गावात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयीताविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय वसंत लिंगायत, एएसआय युनूस शेख, हवालदार दीपक पाटील, साहेबराव चौधरी, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, रवींद्र पाटील, दीपक शिंदे, अशोक पाटील, चालक मुरलिधर बारी आदींच्या पथकाने केली.