जि.प.कारभार स्वच्छतेचे नव्या सीईओंचे अभियान

0

शिरपूर (महेंद्रसिंह राजपूत) । ग्रामीण विकासाचा केंद्र बिंदू म्हणून जि.प. व पंचायत समिती या स्वायत्त संस्था कार्यरत असतात. मात्र अनेक वर्षापासून यावर असलेली राजकारणाची पकड व भ्रष्ट अधिकार्‍यांचे सिंडीकेट यामुळे विकास कमी आणि भ्रष्टाचाराचा अड्डाच जणू या संस्था झाल्या आहेत. काही अपवाद वगळता शासनाचा मुळ हेतु व उदिष्ट शासकीय योजनातुन सफल न होता सामान्यांना मिळणारा फायदा हा भ्रष्टाचारातुन प्रशासकीय वर्गात व ठेकेदार वर्गात परावर्तीत होतो, असा एक समज निर्माण झाला होता. धुळे जि.प. देखील यास अपवाद नाही. मात्र याच जि.प.ला एक शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचे आगमण झाल्याने आता नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

डी.गंगाधारण यांचा कामाचा धडाका
जि.प.धुळे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपला कामाचा धडाकाच जणू डी.गंगाधारण यांनी सुरु केला आहे. जि.प.ची पाहणी करुन त्यांनी अधिक स्वच्छता व पारदर्शी कारभारावर भर देत अधिकार्‍यांना फर्माण काढले. स्वच्छता विषयी जागरुक करतांना त्यांनी अंतर्गत शिस्त देखिल अमंलबजावणी करण्याचे आदेश दिले. यात कर्मचार्‍यांना ड्रेस कोड, आय कार्ड, नोकरीच्या ठिकाणी येण्याचे व जाण्याचे वेळ याबाबत शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. परिसर स्वच्छ करण्याचे व जुण्या इमारतींना रंगकाम करण्याचे सुरु केले आहे. स्वच्छता व शिस्त या बाबत त्रुटी आढळूण आल्यास कर्मचारी ऐवजी थेट विभाग प्रमुखांनावर कार्यवाहीचे संकेत त्यांनी दिले आहेत. अ‍ॅप व थंब मशिन च्या सहाय्याने कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया त्यांनी सुरु केली आहे. जि.प.अधिनियमानुसार गट विकास अधिकार्‍यांना असलेला निलंबीत करण्याचा अधिकार देखिल त्यांनी एक आदेशान्वये घेतला आहे. त्यामुळे गैरप्रक़ारांना व कर्मचार्‍यांवर होणार्‍या अन्यायाला आळा बसुन अधिकार्‍यांच्या अधिकारांना कात्री लावली आहे. पंतप्रधान आवास योजना व ग्रामस्वच्छता व स्वच्छ भारत अभियानावर त्यांनी भर दिली आहे. त्यामुळे गंगाधरण यांच्या कार्यशैलीबाबत समाधान व्यक्त होत आहे. जि.पच्या बाह्य स्वच्छता करत असतांना त्यांनी अंतर्गत कारभाराची स्वच्छता करावी अशी अपेक्षा आता जनता व्यक्त करत आहे.

अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर वचक
यापूर्वी जि.प.च्या कारभाराला मरगळ आली होती. प्रशासकीय नियंत्रण सुटले होते व अधिकार्‍यांचे लागेबांधे अतूट झाल्याने अनेक गंभीर बाबींना तिलांजली देत भ्रष्ट्राचारावर पडदा टाकण्याचे प्रक़ार सुरु होते. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींचा योग्य पाठपुरावा न करता कर्मचारी व अधिकारी यांना बचावाचा प्रयत्न होत होता. दफ्तर दिरंगाई करुन तक्रारींना केराची टोपली दाखवण्याचा एक कलमी कार्यक्रम जि.प.प्रशासनातील काही कर्मचारी व अधिकारी यांनी दाखवला होता. आर्थिक आरोप असलेल्या कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना वाचवण्यासाठी नियमांची पायमल्ली होत होती. वरीष्ठांना या बाबी अवगत करुन दिल्यास फक्त कार्यवाहीचे आश्‍वासन मिळत होते. अधिकार्यांना वाचवण्यात मशगुल असलेल्या काही अधिकारी लाच लुचपत खात्याच्या जाळ्यात देखील अडकले होते. मागील काळात शिरपूर पंचायत समितीचा गैर कारभार व भ्रष्ट्राचार हा चव्हाटयावर आला होता. अनेक गंभीर प्रकरणात आरोप होऊन देखिल यातील दोषी आजही मोकाट आहेत. जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा देखील दिव्याखाली अंधार असे वागत असून ग्रामीण विकासाच्या योजना कार्यान्वीत करतांना गैर प्रक़ारास आळा घालण्यात अपयशी ठरली आहे. अनेक प्रक़ारात आयुक्त व मंत्रालय स्तरावरुन आदेश होऊन देखील कार्यवाहीत कसूर झाला आहे. या सर्व प्रक़ारात जि.प.प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी जबाबदार असून मागील सर्व तक्रारींचा आढावा घेऊन तक्रारदारांना आता न्याय मिळेल अशी अशी जनता गंगाधरण यांच्याकडून करत आहे.