जि.प.बांधकाम उपविभागीय कार्यालयात भोंगळ कारभार

0

नंदुरबार (रवींद्र चव्हाण) । येथील पंचायत समितीत असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींसह नागरिक कमालीचे वैतागले आहेत. कार्यालयीन वेळेत कुणीही अभियंता अथवा जबाबदार व्यक्ती उपस्थित राहत नसल्याने विविध कामांसाठी बाहेर गावाहून येणार्या नागरिकांची कुचंबना होत असल्याची ओरड होवू लागली आहे. अशा ज्युनिअर इंजिनिअर यांच्या कार्यालयीन हालचालींच्या नोंदी तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. पंचायत समितीच्या या कार्यालयावर कुणाचेंच वचक राहीले नसल्यामुळे ही परिस्थीती निर्माण झाली आहे.

अधिकार्‍यांची सेवा संशयास्पद वाटत असल्याचा आरोप
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनश्याम मंगळे यांनीच आता याकडे लक्ष देवून सुधारणा करण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरीकांकडून होत आहे. पंचायत समिती आणि ग्रामिण भागातील नागरीक यांचा विविध कामानिमित्त वारंवार संपर्क होत असतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विविध प्रकारच्या उपाय योजना सुचविण्यासाठी सरपंच, लोकप्रतिनिधी तसेच प्रतिष्ठीत नागरिक कार्यालयात येत असतात, मात्र दुपारचे बारा वाजून देखील संबधीत विभागाचे अधिकारी कार्यालयात येत नाहीत समजा शासनाच्या कामासाठी ज्युनिअर इंजिनिअर किंवा अधिकारी बाहेर असतील तर कार्यालयातील हालचाली रजिष्टरवर त्याची नोंद करावी लागते, मात्र अपवाद वगळता कुणीही हालचाली रजिष्टरवर नोंद करत नाही, त्यामुळे अशा अधिकार्‍यांची सेवा संशयास्पद वाटत असल्याचा आरोप नागरीक करु लागले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मंगले यांनी हालचाली रजिष्टरांच्या नोंदी तपासून कामात कसूर करणार्या बांधकाम विभागाच्या रावसाहेबांवर कारवाई करावी अशी मागणी लोकप्रतिनिधींसह नागरीकांनी केली आहे. एकंदरीतच पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या कार्यालयांची जबाबदारी गटविकास अधिकार्यांवर असते. परंतू त्यांचेही वचक नसल्याच्या तक्रारी होवू लागल्या आहेत.