जि. प. मध्ये महागात पडणार लाचखोरी

0

पुणे । जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात झालेल्या लाचखोरी प्रकरणामुळे पुणे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन झाली आहे. असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी ठोस पाऊले उचलली आहेत. यापुढे कोणी लाचेची मागणी केल्यास तक्रारदार यांना त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधता यावा यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व मजल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे’ सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना येता-जाता हे सूचना फलक खुणावत असून लाच घेतली तर या नंबरवर फोन जाणार’ ही धास्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.

या आधीही अधिकार्‍यांची झाली होती उचलबांगडी
जिल्हा परिषदेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सूचना फलक या आधी नव्हते. दरम्यान, मागील दोन ते तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेत लाचखोरीचे दोन ते तीन प्रकरणे घडली. त्यामध्ये शिक्षण विभागात झालेल्या प्रकरामुळे संपूर्ण जिल्हा परिषद ढवळून निघाली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी ठोस पाऊले उचलत पन्नास हजार रुपयांची लाच घेणार्‍या महिला अधिकार्‍यासह कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई केली. ते तेवढ्यावरच न थांबता या प्रकरणात शिक्षणाधिकारी यांचाही सहभाग असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आल्यावर थेट शिक्षणाधिकारी यांची पदावरून उचलबांगडी केली. या कारवाईमुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना जरब बसला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावले फलक
दरम्यान, या कारवाईनंतर जिल्हा परिषदेच्या सर्व मजल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सूचना फलक दोन्ही बाजूला दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. जेणेकरून कोणी अधिकारी किंवा कर्मचार्‍याने नागरिकांकडून लाच मागितली तर त्या तक्रारदाराला त्वरीत या क्रमांकावरून संबंधीत लोकसेवकाविरोधात तक्रार देता येईल. तसेच, संबधीत तक्रारदाराने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कानावर ही बाब टाकल्यास त्यावर कडक कारवाई होईल. असे आश्‍वासन सीईओ यांनी दिले आहे. या सूचना फलकावर कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी’ असे आवाहन करत त्यांनी हेल्पलाईन नंबर 1064 दुरध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी दिला आहे.