जि.प.सदस्याच्या तक्रारीनंतर हलले प्रशासन ; जोगलखेडा शिवारात बोअरींगचे काम

0

पाणीप्रश्‍न सुटल्याने समाधान ; पोलीस व प्रशासनाच्या समजुतीनंतर वादावर पडदा

भुसावळ – तालुक्यातील जोगलखेड्यासह भानखेडा गावाला पाणीपुरवठा करणार्‍या बोअरवेलमध्ये समाजकंटकांनी दगड-गोटे टाकून ती बुजवण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांना तब्बल 15 दिवसांपासून टंचाईचे चटके सोसावे लागत होते. या संदर्भात जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी सोमवारी तक्रार केल्यानंतर तातडीने कारवाई करण्याचे आदेश भुसावळचे गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांना देण्यात आले होते. मंगळवारी सकाळी प्रशासन व पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जोगलखेडा शिवारातील बोअरींगमधील दगड-गोटे काढण्याचे काम सुरू असतांनाच काही शेतकर्‍यांनी विरोध दर्शविल्याने काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण हजारे, उपनिरीक्षक सुरेश वैद्य यांनी शेतकर्‍यांची समजूत काढल्यानंतर वादावर पडदा पडला व आहे त्या जागी पुन्हा बोअरींग कामाला सुरूवात झाली. बुधवारपर्यंत दोन्ही गावातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा मिळण्याची आशा आहे. दरम्यान, जोगलखेडा शिवारात असलेल्या बोअरींग संदर्भात शेतकरी व ग्रामपंचायत यांच्यात वाद असून हे प्रकरण जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे.

यांची होती उपस्थिती
मंगळवारी शासनातर्फे नायब तहसीलदार संजय तायडे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, जोगलखेडा-भानखेडा सरपंच पंकज पाटील, सदस्य रामसिंग मोरे, दिलीप पाटील यांच्यासह अनेक शेतकर्‍यांची उपस्थिती होती.