जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात येऊन त्यांच्यासह ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील शेतकरी व त्यांच्या कुटुंबाने उपोषण सुरू केले आहे.
सायगाव येथील शेतकरी दिलीप सोनवणे यांच्या वडिलोपार्जित जागेवर जि.प. पाटील यांनी अनेक वर्षांपासून अतिक्रमण केले आहे. तसेच ग्रामपंचायत नमुना नंबर ८मध्ये रातोरात फेरफार करुन बेकायदा १९९९पासून त्यांच्या वडिलांचे नाव भोगवटादार लावून घेतले आहे. यासंदर्भात गटविकास अधिकार्यांनी मालमत्तेची चौकशी केली असता त्यांनी देखील तसा अहवाल दिला आहे. भोगवटा काशिनाथ पाटील यांच्या नावाबाबत ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग बुकमध्ये कुठेही फेरफार ठराव अथवा कुठलाही अर्ज आढळून आला नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे सर्व दस्तऐवजांचे अवलोकन करुन भोगवटा बेकायदेशीर घोषित करुन तो रद्द करावा व फौजदारी गुन्हे दाखल करुन जागा त्वरीत ताब्यात देण्यात यावी. तसेच त्यांची पदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी कारवाई होत नसल्यामुळे सोनवणेंसह सरोजिनी सोनवणे, प्रताप सोनवणे, उषा देशमुख, विजय सोनवणे, लता गायकवाड, स्नेहा देशमुख, शैलजा सोनवणे यांनी उपोषण सुरु केले आहे.