मुरबाड । वाढती महागाई व जीएसटीमुळे यंदाही म्हसा यात्रेवर तुरळक परिणाम दिसून येत आहे. तरीही यात्रेत जवळपास 2,752 बैल विक्रीस आले होते. या बैल बाजारात जवळपास 1 कोटी 25 लाख 76 हजार 212 इतक्या रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. त्यामध्ये यंदा जुन्नर मधील देवराम लांडे यांची खिलार बैल जोडी सर्वात जास्त किमतीला म्हणजे 1 लाख 80 हजार रुपये किंमतीला विकली गेली आहे. मागील वर्षी म्हसा यात्रेत नोटबंदीमुळे 1 कोटी 10 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. मागील वर्षापेक्षा यंदा 10 टक्के जास्त उलाढाल झाल्याचे दिसून येत आहे. तर म्हसा यात्रेमध्ये साथीचे रोग आल्याची अफवा पसरताच यात्रेकरूंमध्ये घबराट निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच मुरबाड गट विकास अधिकारी हाश्मी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तेव्हा अशी कोणत्याही प्रकारची साथ उद्भवलेली नाही अशी माहिती गटविकास अधिकारी हाश्मी यांनी दिली आहे.
म्हसा ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक यशवंत म्हाडासे यांनी सांगितले कि यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारची साथ उद्भवली नसून अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. तरीसुद्धा खबरदारी म्हणून ग्राम पंचायतीतर्फे ठिकठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच म्हसा यात्रेकरूंसाठी 18 बोरवेल व 1 पापं हाऊस याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी यात्रेकरूंनी काळजी घ्यावी व स्वच्छ पाणी प्यावे. तसेच ठीक ठिकाणी पाण्यात टिसेल टाकण्यात आले आहे. म्हसा यात्रेमध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी गेले 5 दिवस थोड्याफार प्रमाणात विक्री केली आहे. त्यामध्ये घोंगडी बाजारात जवळपास 70-75 दुकाने लागली आहेत. त्यांनी जवळपास प्रत्येकी 5 लाखापर्यंत माल खरेदी केलेला आहे. त्यांचा काही प्रमाणात माल विकला गेला आहे. 2 दिवस बंद असल्यामुळे फटका बसल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. तसेच शनिवार व रविवार सुट्टी असल्याने म्हसा यात्रेत भक्तांचा महापूर येईल असे चित्र दिसून येत आहे.
यात्रेत डोंबार्यांची तारेवरची कसरत!
मुरबाड ऐतिहासिक म्हसा यात्रेमध्ये करमणुकीची अनेक साधने असली तरी पोटाची खळगी भरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते याचे चित्र म्हसा यात्रेत पाहायला मिळत आहे. डोंबारी खेळ दाखवून यात्रेकरूंचे मनोरंजन करून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उदरनिर्वाहासाठी इतर कोणतीही साधने उपलब्ध नसल्यामुळे आपल्या लहान मुलांना सहभागी करत जीव धोक्यात घालून या लोकांना अशा प्रकारचे खेळ करावे लागतात. दोरीवरून चालताना तोल गेल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने उद्योगधंदा करण्यासाठी अर्थ साहाय्य करावे अशी मागणी डोंबारी खेळ करणार्या समाजाने केली आहे.
तर म्हसा यात्रेत म्हसा प्राथमिक केंद्रात नेहमीप्रमाणे रुग्ण तपासणी चालू आहे. त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, जुलाब इत्यादी आजारांवर प्राथमिक उपचार चालू आहेत. मात्र चालू असलेल्या म्हसा यात्रेत कोणत्याही प्रकारची साथ उद्भवली नाही
– डॉ. एस. एल. भडकवाढ,
वैद्यकीय अधिकारी – म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्र