जीएसटीची अंमलबजावणी अन्यायकारक पद्धतीने होते – खा. सुप्रिया सुळे

0

जेजुरीत व्यापार्‍यांची बैठक

जेजुरी : जीएसटीला विरोध नसला तरी त्याची अंमलबजावणी अन्यायकारक पध्दतीने होत आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने जीएसटीतील व्यापार्‍यांना त्रासदायक ठरणार्‍या अटी दूर कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. जेजुरी येथे व्यापार्‍यांच्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यासाठी व्यापार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यापार्‍यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, जालिंदर कामठे, सुदाम इंगळे, राजेंद्र पेशवे, नगरसेवक अरुण बारभाई आदी याप्रसंगी उपस्थित होते.

व्यापार्‍यांनी वाचला समस्यांचा पाढा

जाहिरातातील वास्तवता प्रत्यक्ष दिसते का असा सवाल करून शेती मालाला भाव नाही, जाचक अटींमुळे व्यापारी अडचणीत सापडले आहेत. फक्त जाहिरातबाजी करून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप सुळे यांनी यावेळी केला. जेजुरी शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीची असलेली जागा वापरण्यासाठी देता येईल का याबाबत जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करू. तेथे सध्या बाजार भरतो. बाजारातील व्यापारी व शेतकरी यांना तेथे सुविधा देता येतील, असे सुळे यांनी सांगितले.

जयदीप बारभाई, विठ्ठल सोनवणे, मेहबुब पानसरे, नारायण आगलावे, मोहन नाझीरकर यांनी यावेळी व्यापार्‍यांच्या अडचणी मांडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष एन. डी. जगताप यांनी सूत्रसंचालन केले. राहुल घाडगे यांनी आभार मानले.

जेजुरी पालिकेच्या मोरगाव रस्त्यावरील असलेल्या गाळाधारकांची मुदत संपल्याने पालिकेने नव्याने लिलाव करण्याच्या नोटिस दिल्या आहेत. बैठकीत या विषयावर लक्ष वेधण्यात आले. गेली अनेक वर्षे व्यवसाय करणारे व्यापारी व दुकानदार यानिमित्ताने अडचणीत येणार आहेत. त्यांच्यावर हा अन्याय आहे. व्यवहार आणि कायदा यांची सांगड घालून हा प्रश्‍न सोडविता येईल. त्यासाठी आपण संबंधित अधिकार्‍यांशी बोलून मार्ग काढू. सुप्रिया सुळे, खासदार