राज्य सरकारने परिपत्रकच काढले नाही; तिकिटांबाबत निर्माण झाली संभ्रमावस्था
पुणे : चित्रपट तिकिटांवरील वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयापासून चित्रपट रसिक दूरच आहेत. मात्र, याच्या अंमलबजावणी संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक जारी न केल्याने जीएसटी दरामध्ये घट झाल्यानंतरही चित्रपट तिकिटाचे दर कमी झाले नाहीत. नव्या वर्षांत चित्रपटांची पर्वणी मिळेल असे वाटत असतानाच तिकिटांबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याबाबत राज्य सरकारचे परिपत्रक मिळाले नसून; एकपडदा चित्रपटगृहांच्या दरात फरक पडणार नसल्याचे पुण्यातील चित्रपटगृहाच्या मालकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
‘मल्टिप्लेक्स’मधील तिकीटदर शंभर रुपयांच्या पुढेच!
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत एक जानेवारीपासून जीएसटी दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शंभर रुपयांपर्यंतच्या चित्रपट तिकीट दरावरील जीएसटी 18 टक्क्यांऐवजी 12 टक्के तर शंभर रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तिकिटावरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याचे घोषित केले होते. त्या निर्णयानुसार शंभर रुपयापर्यंतच्या तिकीट दरावरील जीएसटी सहा टक्क्यांनी कमी होणार असल्याने एक पडदा चित्रपटगृहांच्या तिकीट दरामध्ये हा बदल लगेच लागू होणार होता. सध्या 18 टक्के जीएसटी आकारणीनुसार 18 रुपये द्यावे लागत होते ते आता 12 रुपये याप्रमाणे द्यावे लागणार आहेत. तर, बहुपडदा (मल्टिप्लेक्स) चित्रपटगृहातील तिकीटदर शंभर रुपयांच्या पुढेच असल्याने या तिकीट दरावरील जीएसटी आकारणीमध्ये दहा टक्क्यांनी कपात होणार आहे.
तिकिटामध्ये फारसा फरक नाही
चित्रपट तिकिटांवरील जीएसटी कपातीसंदर्भात राज्य सरकारचे परिपत्रक अद्यापही हातात पडलेले नाही. काही एकपडदा चित्रपटगृहांचे दर हे शंभर रुपयांच्या आतच आहेत. त्यामुळे जीएसटी दरामध्ये कपात झाली असली तरी तिकीट दरामध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे ‘सिनेमा ओनर्स अॅन्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे दीपक कुदळे यांनी नमूद केले.
मल्टिप्लेक्समध्ये जुन्याच दर
केंद्र शासनाने निर्णय जारी केल्यानंतर त्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही राज्य सरकारवर असते. त्यानुसार कोणताही निर्णय लागू करताना राज्य सरकारकडून एक परिपत्रक पाठवले जाते. मात्र, हे परिपत्रक अद्यापही मिळाले नसल्याचे सांगून नव्या वर्षातही जुन्या दराने तिकिटाचे दर आकारण्यात आले. काही एक पडदा चित्रपटगृहचालकांनी शुक्रवारपासून आठवडा सुरू होत असल्याने तेव्हाच नवीन दर लागू करण्याचे सूचित केले. तर मल्टिप्लेक्समध्ये जुन्याच दराने तिकिटाची विक्री होत असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाचे परिपत्रक मिळाले नसल्याची सबब पुढे केल्यामुळे नव्या वर्षारंभदिनी चित्रपट रसिकांना तिकीट दरात कपातीपासून वंचित रहावे लागले आहे.
दर ऐंशी आणि शंभर रुपयेच
राज्यामध्ये पूर्वी मराठी चित्रपट करमुक्त होता. त्यानंतर केंद्र सरकारने जीएसटी लागू केला तेव्हा तिकिटाच्या दरामध्ये वाढ केली नव्हती. आम्हाला 18 टक्के जीएसटी भरावा लागत असला तरी त्याची झळ प्रेक्षकांना बसू दिली नव्हती. त्यामुळे आता जीएसटी 18 वरून 12 टक्क्यांवर आला असला तरी तिकीट दरामध्ये कपात होण्याची शक्यता नाही. मुळातच किबे लक्ष्मी थिएटरमध्ये तिकिटाचे दर ऐंशी रुपये आणि शंभर रुपये इतकाच आहे, असे किबे लक्ष्मी थिएटरचे व्यवस्थापक सखाराम रेणुसे यांनी सांगितले.