जीन्स कारखानदारांची पालकमंत्र्यांसोबत 28 नोव्हेंबरला होणार बैठक

0

ठाणे । अंबरनाथ आणि बदलापूर एमआयडीसीतील रासायनिक कारखाने अतिविषारी रंगहीन सांडपाणी थेट नाल्यात सोडत आहेत. ते पाणी वालधुनी नदीला मिळते. त्यामुळे नदी सर्वाधिक प्रदूषित झाल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आला होता. वारंवार सूचना देऊनही सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास तयार न झालेल्या जीन्स कारखान्यांनी प्रक्रियेची हमी द्यावी आणि कारखान्यांवर आलेली बंदी टाळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मंगळवार, 28 नोव्हेंबरला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली आहे. आमच्यामुळे अवघे दोन टक्के प्रदूषण होते. उरलेले प्रदूषण अंबरनाथ, बदलापूरचे रासायनिक कारखाने करतात, असा दावा जीन्स कारखान्यांनी केला आहे.

उल्हास आणि वालधुनी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्‍न गाजतो आहे.
सर्वोच्च न्यायालयाने वालधुनी नदी प्रदूषित करणार्‍या जीन्स कारखान्यांचे वीज व पाणी तोडण्याचे आदेश पालिकेसह वीज मंडळाला दिले. ती तोडण्यापूर्वीच शुक्रवारपासून कारखानदारांनी बंद पाळला. त्यानंतर त्यांनी खासदार, आमदारांकडे भूमिका मांडली. जीन्स कारखाने बंद न करता तोडगा काढावा, यासाठी वेगवेगळे दबावगट कामाला लागले आहेत.

कारखानदार आक्रमक
आमच्यामुळे अवघे दोन टक्के प्रदूषण होते. उरलेले प्रदूषण अंबरनाथ, बदलापूरचे रासायनिक कारखाने करतात, असा दावा जीन्स कारखान्यांनी केला आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर यांनी चालीया हॉलमध्ये कारखानदारांचे म्हणणे ऐकून घेतले आणि मंगळवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक होणार आहे. डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यांना ज्याप्रमाणे प्रक्रिया न केलेले पाणी न सोडता उद्योग सुरू ठेवण्यास मुभा मिळाली, तसा तोडगा काढण्याचा
प्रयत्न सुरू आहे.