पिंपरी : शाळा आणि घर हे संस्कार केंद्रे आहेत. मात्र संस्कार देवून सुद्धा आज विद्यार्थ्यांमधून उत्तम नागरीक घडेलच याची शाश्वती नाही. यासाठी शाळेत मुलांना शिक्षणासोबतच जीवन कसे जगायचे याचे शिक्षण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले. म्हेत्रे वस्ती चिखली येथील राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने आयोजित केलेल्या विवेक व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘आजच्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी-पालक भरकटला का’या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. यावेळी डॉ.सबनीस यांना आदर्श साहित्यिक पुरस्कार तर माहिती महाराष्ट्र अधिकार संघाचे अध्यक्ष, जल अभ्यासक रामदास जंगम यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच माजी मुख्याध्यापक मधुकर पेद्देवाड यांना गुरुतुल्य पुरस्कार, सहाय्यक पो.निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांना कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार, ज्योती कांबळे, अनिता काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत म्हेत्रे, ललिता सबनीस, युवा व्याख्याती यशोदा नाईकवडे, अंकुश मळेकर, अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष व्यंकट वाघमोडे, उपाध्यक्ष मोहन देवकाते, सचिव रमाकांत वाघमोडे आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
मोबाईलचा अतीवापर
डॉ.सबनीस पुढे म्हणाले की, मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी नात्यामधील अंतर दूर झाले. पालक मोबाईलचा अतिरेकी वापर पाहून मुले देखील अति मोबाईल वापरत आहे. मुलांना मोबाईल वापरायला न दिल्याने आत्महत्या करीत असल्याच्या घटना घडत आहे. आज मोबाईल हा शिक्षणातील अडथळा बनत आहे. मुलांना घडविण्यासाठी पालक-शिक्षक यांच्यात समन्वय असावा. आज मुलांमध्ये सामाजिक जाणिवेचे मूल्य रुजवण्याची गरज आहे. सर्वधर्म समभावाची धडे द्यावेत. आज आपण जातीय भिंतीत अडकून पडलोय. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष वाघमोडे यांनी केले. सूत्रसंचालन रंजना आव्हाड तर आभार सुनीता बनसोडे यांनी मानले.