बारामती । जळोची या भागासाठी निर्माण करण्यात आलेलया महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या कारभारावर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील अनागोंदी कारभाराचा फटका ग्राहकांना बसत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. गेल्या चार महिन्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या ग्राहकांना पाण्याची बिलेच मिळालेली नाहीत. तसेच मिळणार्या बिलामध्येदेखील जादा दराची आकारणी करण्यात आली आहेत. ग्राहकांना चुकीची बिले आली आहेत. त्यामुळे ग्राहकांना मजीप्राच्या जळोच्या येथील कार्यालयात बिल दुरूस्तीसाठी आणि बिल घेण्यासाठी हेलपाटे घालावे लागत आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या अनागोंदी कारभारामुळे ग्राहक संतप्त झालेले आहेत. याबाबत ग्राहकांना नाराजी व्यक्त केली आहे. मुळातच ही योजना जळोची येथील रहिवाशांसाठी असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकारणने ती विस्तारीत करून तांदूळवाडी, रूई या भागात नेली आहे. त्यामुळे जळोचीच्या ग्राहकांना संध्याकाळी तीन तास पाणी देण्याचा उलटा न्याय देण्यात आलेला आहे. मुळच्या योजनेत चोवीस तास पाणी देणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाने ग्राहकांना लेखी दिलेले आहे. परंतु त्याला केराची टोपली दाखवीली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाने बिलासाठी कराड येथील जे. एस. मरीन या कंपनीशी करार केला आहे. या कंपनीला बिल बनविण्याचे काम देण्यात आले असून कंपनीने विकसीत केलेले तंत्रज्ञान हे अर्धवट स्वरुपाचे आहे. त्यामुळे बिलामध्ये फारच घोटाळे होताना दिसत आहेत. दुसर्या प्रतीचे बिल मिळण्यासाठी ग्राहकांना अर्धा-अर्धा तास रांगेत थांबावे लागत आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाचे बारामती येथील उपअभियंता परिंचे म्हणाले, सॉफ्टवेअर विकसीत होत असून नवीन कंपनी असल्यामुळे तांत्रिक चुका होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्रास होतो आहे व हेलपाटे मारावे लागतात.
ग्राहक आंदोलनाच्या पवित्र्यात
महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाने अर्थपूर्ण व्यवहार करीत बारामतीतील तांदूळवाडी व रूई तसेच इतर भागातील ग्राहकांना पाणीपुरवठा केला आहे. ग्राहक झाल्यामुळे सर्वांवरच अन्याय झालेला आहे. नियोजनाचा अभाव, नगरसेवकांचा दबाव आणि लोकप्रतिनिधींचा आग्रह या सर्वांमुळे योजनेचा बट्टयाबोळ झाला आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना कोणतीही सूचना न देता 50 टक्के दरवाढ करण्याचा पराक्रमही महाराष्ट्र जीवन प्राधिकारणने केला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. ग्राहक आता आंदोलनाच्या तयारीत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकारणकडे कारभार सुधारण्याची मागणी करत आहेत.