‘जीवन विद्या मिशन’ने फुलवला हजारो लोकांच्या जीवनात आनंद

0

पिंपरी-चिंचवड : सद्गुरू प्रल्हाद वामनराव पै यांचे विचार हे माणसाच्या मनामध्ये स्फुल्लिंग जागवणारे असतात. त्यामुळे मनाला प्रेरणा मिळते. आपल्या आसपास नातेवाईक असतात. परंतु, आपल्याला खरी मदत मिळते ती आपल्या मनाकडूनच. म्हणूनच तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, हा जीवनविद्येचा विचार माणसाला प्रेरणा देत राहतो, असे प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. भोसरीतील श्री ज्ञानेश्‍वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्यात प्रल्हाद पै यांना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने बापट यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

जीवन विद्या मिशन प्रेरणाच
बापट म्हणाले, जीवनविद्या मिशनचे कार्य मोठे आहे. प्रल्हाद पै यांची वाणी ऐकण्यासाठी सर्वसण आतूर असतात. त्यांची वाणी ऐकून चांगली भाषणे देता येतात. नागरिकांवर चांगले संस्कार होतात. जीवनामध्ये परिवर्तन होण्याकरिता, हातातून चांगले कार्य होण्याकरिता जीवनविद्या मिशन प्रेरणा देते. माणूस जेव्हा पुढे जाईल. तेव्हा राष्ट्र पुढे जाते. आशीर्वाद, भावनेने काम होत नाहीत. त्याला व्यवहाराची जोड लागते. माणसाच्या मनाला स्फूर्ती देण्याचे कार्य प्रल्हाद पै यांच्या प्रबोधनातून होत असते

शहराचा सन्मान वाढला
ते म्हणाले, आपणाला मदत करण्यास सगळेच आहेत. परंतु, त्याअगोदर तुला तुझे मनच मदत करायला तयार आहे. दुसरा कोणी नाही. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही भावना प्रत्येकाच्या मनात बिंबविण्याचे काम सद्गुरु प्रल्हाद पै करत आहेत. पै यांना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मानपत्र देऊन गौरविल्याने शहराचा सन्मान वाढला आहे. अशा विचारांचा सन्मान या नगरीत झाला याचा आनंद आहे. पिंपरी-चिंचवड शहर केवळ औद्योगिकनगरी नव्हे तर सांस्कृतिकनगरी देखील आहे.

यांची होती उपस्थिती
सोहळ्यास खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेवक अमित गावडे, बाबू नायर, सदाशिव खाडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक राहुल जाधव, कुंदन गायकवाड, संतोष लोंढे, नितीन लांडगे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, राजेंद्र लांडगे, विलास मडेगिरी, संजय नेवाळे, वसंत बोर्‍हाटे, नगरसेविका साधना मळेकर, अश्‍विनी जाधव, सुवर्णा बुर्डे, सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, कमल घोलप, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, यशोदा बोईनवाड, योगिता नागरगोजे, नम्रता लोंढे, स्वीनल म्हेत्रे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, दिनेश यादव आदी उपस्थित होते. मानपत्राचे वाचन जीवनविद्या शैलेश जोशी यांनी केले.