जीव-शिवाचे ऐक्य म्हणजे काला

0

मुक्ताईनगर । लौकीक अर्थाने पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे खाद्यपदार्थ एकत्र कालविणे म्हणजे काला होय. गोकुळात श्रीकृष्णाने गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. मात्र अलौकिक अर्थाने जीवशिवाचे ऐक्य म्हणजे काला होय. असा काला जीवनात आनंदाची प्राप्ती करून देत असल्याचे प्रतिपादन हभप तुकाराम महाराज मेहूणकर यांनी केले.

श्री क्षेत्र मेहूण तापीतीर येथे सुरू असलेल्या महाशिवरात्री महोत्सव समारोपात आयोजित काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. गवळीयाने ताक पिले या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर चिंतन करून त्यांनी श्रीकृष्ण लीलांचे कथन केले. ते म्हणाले की, गोपाळकाला म्हणजे पांढर्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला संचय होय. गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधीत्व करतो. पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेहूण तापीतीर मुक्ताई भक्तीच्या मळ्याने फुलले
दरवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या महापर्वावर मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र मेहूण तापीतीर येथील आदिशक्ती संत मुक्ताई तिर्थक्षेत्राला महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशातील 60 दिंड्या हजारो भाविकांसह 21 रोजी दाखल झाल्या. दिंड्यांचे स्वागत हभप लक्ष्मण महाराज यांनी केले. हजारो भाविकांमुळे संत मुक्ताईचे गुप्तस्थान मेहूण तापीतीर मुक्ताई भक्तीच्या मळ्याने फुलले होते. 22 रोजी श्री संत मुक्ताईंचा महाभिषेक, महापूजा व महाआरती न्या. राजेंद्र तुँवर व रोहिणी तुँवर सपत्नीक यांच्या हस्ते करण्यात आली. देवस्थानचे सचिव हभप रामराव महाराज रचित श्री संत मुक्ताबाई गुप्तस्थान सत्यार्थ प्रकाश या पुस्तिकेचे प्रकाशन हभप तुकाराम महाराज सखारामपूरकर व महाराज मंडळी यांच्या हस्ते करण्यात आले. एकादशीनिमित्त मेहूण-चिंचोल ग्रामस्थांतर्फे सुमारे 10 क्विंटल मोफत फराळाचे वाटप करण्यात आले. सकाळपासून चंद्रकांत महाराज म्हसावद, राजू महाराज पिंपळकोठा, किशोर महाराज तळवेलकर, गोविंद महाराज वरसाडेकर, नामदेव महाराज रवंजेकर, बाळकृष्ण महाराज खेडी भोकरी यांची कीर्तने झाली. सायंकाळी देवस्थानला सर्व दिंड्यांनी प्रदक्षिणा घातली.

पंचामृताचा महाभिषेक व महाआरती
23 रोजी रामेश्वर महाराज नागेश्वर संस्थान धुळे, योगेश महाराज धामणगाव यांची दिवसा कीर्तने व रात्री निलेश महाराज सखारामपूरकर यांचे कीर्तन झाले. दुपारी तुकाराम महाराज सखारामपूरकर यांचे प्रवचन झाले. माघ महाशिवरात्रीचे औचित्य साधून 24 रोजी पहाटे श्रीसोमेश्‍वर महादेवाचा पंचामृताचा महाभिषेक व महाआरती भुसावळ येथील ज्ञानेश्वर घुले व सुनंदा घुले आणि सुनिल वानखेडे व नलिनी वानखेडे या दोन दांम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पुजारी हभप भानुदास महाराज मेहूणकर व हभप ज्ञानेश्वर महाराज मेहूणकर, डॉ. जगदीश पाटील, हर्षल पाटील यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. त्यानंतर सकाळपासून मुकूंद महाराज पहूर, पुरुषोत्तम महाराज मडाखेडकर, त्र्यंबक महाराज दहिदकर, ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर, सुधाकर महाराज मेहूणकर यांची कीर्तने झाली. दुपारी योगेश महाराज धामणगावकर यांचे प्रवचन झाले. 25 रोजी सकाळी महाशिवरात्री महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी हभप तुकाराम महाराज मेहूणकर यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. त्यानंतर महोत्सवात सहभागी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षाप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने भाविकांची अलोट गर्दी जमल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यशस्वीतेसाठी संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान पदाधिकारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.