पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा ‘सजग’चा आरोप
टाकी कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता
पुणे । विधी महाविद्यालय, एरंडवणा, भांडारकर रस्ता तसेच प्रभात रस्ता परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तब्बल दहा वर्षांपूर्वी बांधलेली पाण्याची टाकी वापराविना पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेली जुनी टाकी जीर्ण अवस्थेत असल्याने ही टाकी बांधण्यात आली होती. जुनी टाकी धोकादायक अवस्थेत असून ती कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने याबाबत उपाय योजना केली जावी अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, निमंत्रक विश्वास सहस्रबुद्धे यावेळी उपस्थित होते.
महापालिकेने या ठिकाणी बांधलेली जुनी टाकी तब्बल 45 वर्षे जुनी आहे. ती अद्यापही वापरात आहे. या टाकीचा स्लॅब धोकादायक स्थितीत असून या टाकीला अनेक ठिकाणी गळतीही लागलेली आहे. तसेच या टाकीच्या स्लॅबला मोठी छिद्रे पडलेली असून त्यातून पिण्यासाठी पुरविल्या जाणार्या पाण्यात कचरा तसेच पावसाने साठलेले घाण पाणी टाकीत जात आहे. त्यामुळे सुमारे दहा वर्षांपूर्वी पालिकेने ही टाकी बंद करण्यासाठी नवीन टाकी बांधली.
नवीन टाकीचीही दुरवस्था
मात्र, त्यानंतर ती टाकी वापरातच आलेली नाही. त्यामुळे या नवीन टाकीचीही दुरवस्था झालेली असून ती वापरण्याच्या स्थितीत नाही. परिणामी या टाकीसाठी केलेला लाखोंचा खर्च वाया गेला आहे. त्यातच; आता महापालिका शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी शहरभर नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी वेगळा खर्च करण्याचा घाट घालत असून या टाकीप्रमाणे शहरात अनेक टाक्या अशाच बांधून पडलेल्या असल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दहा वर्षापूर्वी बांधलेल्या टाकीची आवश्यक असलेली दुरुस्ती करून तीचा वापर सुरू करावा अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.