विकास आराखड्याचे काम अपूर्ण : राज्य शासनाचे दुर्लक्ष
जुन्नर : ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि सांस्कृतिक, नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्टया नटलेल्या जुन्नर तालुक्याला राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार विकासाच्या दृष्टीने तालुक्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट – डीपीआर) तयार करून तालुक्यासाठी स्वतंत्र निधी देण्यात येणार होता. या संदर्भातील अध्यादेश काढल्यानंतर शासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे जुन्नरचा पर्यटनाच्या अंगाने होणारा विकास कागदावरच आहे.
जुन्नर तालुका विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप जुन्नरचा विकास आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच या भागात कोणत्या सोयी-सुविधा सुरू करणे आवश्यक आहे. हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पर्यटन स्थळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) खासगी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली जाते. मात्र, जुन्नर तालुक्यामध्ये केवळ एक केंद्र सुरू आहे.
ऐतिहासिक वारसा
जुन्नरचा विचार करता या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला व इतर ऐतिहासिक किल्ले आहेत. तसेच 150 वर्षाची परंपरा असलेला अणे उत्सव असून 350 वर्षाची परंपरा असलेला बेल्हे गावचा आठवडे बाजार आहे. त्याचप्रमाणे खोडद येथे जागतिक महादूर्बिण आहे. शिवनेरीसह निसर्ग सौंदर्याने नटलेले सात किल्ले आहेत. सर्वाधिक 350 लेण्या असून अष्टविनायकापैकी लेण्याद्री, ओझर ही दोन अष्टविनायक मंदिरे आहेत. तसेच 3 हेमाडपंथी बंधणीतील कोरीव पुरातन मंदीरे आहेत. तसेच नाणेघाट-घाटघर, दर्याघाट, आणेघाट- आणे असे निसर्ग रम्य घाट व प्रसिद्ध धबधबे आहेत.
विकासकामांसाठी जागेची पाहणी
विविध पठारे तसेच गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फूट खोल असलेले कोकणकडे आहेत. पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक लहान मोठी ठिकाणे जुन्नरमध्ये आहेत. त्यात माणिकडोह गावातील कुकडी नदी, पुरातन काळात भूकंप झालेल्या उद्रेकाची राख बोरीगावत आहे. तमाशाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे नारायणगाव, बिबट्या निवारण केंद्रही पर्यटकांना आकर्षित करते. एमटीडीसीने जुन्नरमध्ये विविध विकासकामे हाती घेण्यासाठी काही जागांची पाहणी केली आहे. तसेच तज्ज्ञांच्या सहकार्याने या तालुक्याचा विकास आराखडा तयार केला जाणार होता. मात्र, अद्याप आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एमटीडीसीचे एकही केंद्र नाही!
पर्यटन व्यवसायाला चालना मिळाल्यास त्याचा फायदा संबंधित गाव व जिल्ह्याला मिळत असला तरीदेखील कुचकामी सरकारी यंत्रणेमुळे काही खासगी व्यावसायिकांची अरेरावी पर्यटनस्थळांवर दिसून येते. गेल्या काही वर्षांमध्ये इको टुरीझमची संकल्पना वाढीस लागली असताना त्या संकल्पनेचे योग्य व्यवस्थापन नसल्याने सध्या पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पर्यटन स्थळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) खासगी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली जाते. जुन्नर तालुक्यामध्ये मात्र आज घडीला केवळ एक केंद्र सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.