जुन्नर तालुक्यातील खिरेश्‍वरच्या लेण्यांची देखभालीअभावी दूरवस्था

0

पुणे : राज्यात सर्वाधिक लेण्या जुन्नर तालुक्यात आढळतात. मात्र, त्या परिसरातील बर्‍याचशा लेण्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली असून, पुरातत्त्व विभागही या लेण्यांबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याजवळील आणि खिरेश्‍वर मंदिराशेजारील लेण्यांची दूरवस्था झाली असून, त्यांच्या डागडुजीकडे वेळीच लक्ष न दिल्यास या लेण्या नामशेष होण्याचा धोका आहे.

जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणाच्या जवळ खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिराजवळ काही अंतरावर एका खडकात प्राचीन लेणी कोरलेली असून, या लेण्यांतील 30 फूट बाय 50 फूट लांबीचा सभामंडप 10 दगडी खांबांवर उभा आहे. सभामंडपाच्या शेजारीच साधारणपणे 10 बाय 10 ची एक खोली आहे. सभामंडपाच्या दगडी खांबांची अनेक ठिकाणी तुटफूट झाली असून, काही खांबांना मोठे तडेही गेले आहेत. ही लेणी सपाटीला असल्यामुळे नागेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर सहज कोणाच्या दृष्टीस पडत नाहीत. जवळ जाऊन पाहिल्यानंतरच या ठिकाणी लेणी असल्याचे जाणवते.

देशातील सर्व लेण्या या साधारणपणे लोहयुगात तयार करण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत सुमारे 1200 लेण्या सापडल्या असून, त्यांपैकी 800 बुद्धलेण्या आहेत. एकट्या जुन्नर तालुक्यातच 350 लेण्या आहेत. या लेण्यांमध्ये काही जैन लेण्या आणि काही बुद्ध लेण्या आहेत. जुन्नर तालुक्यात सर्वात पहिली खोदलेली लेणी ही तुळजा लेणी असून, या सर्व लेण्या त्या वेळच्या राजे, महाराजांनी दिलेल्या देणग्यांमधून तयार करण्यात आल्याचे उपलब्ध शिलालेखांमधून आढळते.

जुन्नर तालुक्यातील या लेण्या सातवाहनकालातील असून, चंद्रगुप्त मौर्य ते इ. स.पूर्व दुसर्‍या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील आहेत. बौद्ध धर्माच्या प्रसाराचा व प्रचाराचा केंद्रबिंदू म्हणून जुन्नर तालुक्याची एक ओळख असून, बौद्ध धर्माचा प्रचार करण्याचे काम प्रथम जुन्नर तालुक्यातच सुरू करण्यात आल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. या लेण्यांमधील शिलालेख हे ब्राह्मी लिपीत असून, त्याची भाषा प्राकृत भाषा आहे, असे इतिहासाचे अभ्यासक बापू ताम्हाणे यांचे मत आहे.

खिरेश्‍वर मंदिराप्रमाणेच शिवनेरी किल्ल्याजवळही काही लेणी आहेत. जुन्नर शहराजवळ असलेल्या या लेण्यांकडेही पुरातत्व खात्याचे पुरेसे लक्ष गेलेले दिसत नाही. या लेण्यांच्याही डागडुजीची गरज आहे. ही डागडुजी न केली गेल्यास ही लेणीही नामशेष होण्याचा धोका आहे.

जुन्नर तालुक्यातील नाणेघाटाचा परिसर लेण्यंसाठीही प्रसिद्ध आहे. इतिहास काळात हा व्यापाराचा प्रमुख मार्ग होता. या घाटातील नानाचा अंगठा नावाने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाच्या परिसरात असलेल्या लेण्यांच्या डागडुजीचे काम पुरतत्व खात्याने केले आह. त्यामुळे या लेण्या पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दीही होते आहे. याच धर्तीवर तालुक्यातील अन्य् लेण्यांच्या डागडुजी व संवर्धनाकडे लक्ष देण्याची मागणी इतिहासप्रेमी करत आहेत.