पिंपरी-चिंचवड : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका पिता-पुत्रास लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना रहाटणी येथील श्रीहरी कॉलनी समोर रविवारी (दि. 11) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली. याबाबत निशांत समाधान धनवे (वय 19, रा. धनवेचाळ, पवनानगर रहाटणी) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भरत पालमपल्ले, राहुल सावंत, शत्रुघ्न पालमपल्ले, खंडू लोंढे, अविनाश जाधव आणि अन्य तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रहाटणीतील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निशांत धनवे रहाटणी येथील श्रीहरी कॉलनीसमोरून जात असताना आरोपींनी त्याला अडविले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून निशांतला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यावेळी निशांतचे वडील समाधान धनवे भांडणे सोडविण्यासाठी आले असता त्यांच्या छातीवर लोखंडी रॉड मारून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना भर दिवसा घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे करीत आहेत.