जुन्या भांडणातून तडीपार गुंडावर वार

0

पाच जणांना अटक; दोघे फरार

पिंपरी-चिंचवड : जुन्या भांडणाचा राग मनात धरुन सात जणांच्या टोळक्यांनी कोयता व चॉपरने एका तडीपार गुंडावर वार केले. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास खराळवाडी येथील भगवत्गीता मंदिराजवळ घडली. दिनेश विलास शिंगाडे (वय 28, रा. खऱाळवाडी) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणातील विठ्ठल मारुती बनपट्टे (वय 35), कमलेश युवराज बनपट्टे (वय 24), गणेश राजू बनपट्टे (वय 26), जॉर्ज विल्यम फ्रान्सीस (वय 35, सर्व रा. खऱाळवाडी), अविनाश राजू चौगुलै (वय 22, रा. वडारवाडी, गोखलेनगर) यांना अटक केली आहे. तर संजय बनपट्टे (वय 35), राजु बनपट्टे (वय 45) फऱार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश शिंगाडे याला गुंडगिरीमुळे पिंपरी हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. तो आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी खराळवाडी येथे घऱी आला होता. आईला भेटून तो परत जात असताना विठ्ठल बनपट्टे याने जुन्या भांडण्याचा राग मनात धरून त्याच्यावर साथीदारांच्या मदतीने कोयता व चॉपरने वार केले. यामध्ये त्याच्या पोटावर व डोक्याच्या मागील बाजूस मोठी जखम झाली आहे. यावेळी ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या त्याची चुलती काकू सुंदर शिंगाडे हिच्याही डाव्या हातावर वार केले आहेत.