जुन्या वादातून उमाळा फाट्यावर हाणामारी : तिघांविरोधात गुन्हा

जळगाव : तालुक्यातील उमाळा फाट्यावर एकाला जुन्या वादातून तीन जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
उमाळा येथे भागवत शामराव पाटील (50) हे वास्तव्यास असून सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भागवत पाटील हे त्यांचा भाचा गोकूळ याच्यासोबत उमाळ्या फाट्यावरील जय भवानी टी सेंटर या दुकानासमोर उभे होते. यावेळी मागील भांडणाच्या कारणावरुन गजानन काशीनाथ बिर्‍हाडे, अनिल गंगाधर कोलते, बाळू गंगाधर कोलते (सर्व रा.उमाळे) या तिघांनी भागवत पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. गजानन बिर्‍हाडे याने भागवत पाटील यांच्या डोक्यात दगड मारला तर इतर अनिल कोलते व बाळू कोलते या दोघांनी भागवत पाटील यांचा भाचा गोकूळ यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जय भवानी टी सेंटरवरील लाकडी बाकडे व खुर्च्या तोडून नुकसान केले. याप्रकरणी भागवत पाटील यांच्या तक्रारीवरुन गजानन काशिनाथ बिर्‍हाडे, अनिल गंगाधर कोलते, बाळू गंगाधर कोलते या तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील हे करीत आहेत.