जुमले बाजीविरोधात पतंगबाजी

0

पुणे : अच्छे दिन येतील… दोन कोटी लोकांना रोजगार देऊ… प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील 15 लाख… पंतप्रधान मोदी यांच्या या जुमले बाजीचे पतंग काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी उडविले.

संक्रांतीच्या निमित्ताने मोदी यांच्या जुमलेबाजीचा निषेध करण्यासाठी माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणिस मोहन जोशी यांनी जुमला पतंग उत्सव तळजाई टेकडीवर आयोजित केला होता. या उत्सवातील पतंगबाजीत नागरिकही सहभागी झाले. पतंग उडवून जोशी यांनी प्रारंभ केला आणि नंतर अच्छे दिन, दोन कोटी लोकांना रोजगार, पुणे करणार स्मार्ट सिटी, विदेशातून काळा पैसा आणू, शेतीमालाला दीडपट भाव देऊ, औषधे स्वस्त करू, प्रत्येकाला घर देऊ अशा मोदींच्या पूर्ण न झालेली आश्‍वासने पतंगावर लिहिली होती. हे पतंग हवेत उंच उडाले तेव्हा लोकांमध्ये कुतुहूल निर्माण झाले. जुमलेबाजीच्या निर्षधार्थ पतंग उडविताना काँग्रेस कार्यकर्त्याचा सहभाग मोठा होता.

मोदी यांनी जनतेला वारेमाप आश्‍वासने दिली आणि साडेचार वर्षाच्या कार्यकाळात ती पूर्ण झाली नाहीत, लोकांचा अपेक्षाभंग झाला. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी जुमला पतंग उत्सव आयोजित केला. 2019च्या निवडणुकीत मोदींचा पतंग कट करू असे जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.