एरंडोल । येथील जुम्मा मस्जिद फसवणुक व अपहार प्रकरणी सुरु असलेल्या तपासाची कागदपत्रे आणि प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने तपास अधिकार्यांना दिले. याबाबत माहिती अशी की, अल्ताफखान नय्युमखान पठाण यांनी जुम्मा मस्जिद ट्रस्टच्या पदाधिकार्यांविरोधात एरंडोल न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यानुसार ट्रस्टचे चिरागोद्दीन शेख हुसेन व शेख इस्माईल शेख अमीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे करीत आहेत. मात्र सदर गुन्ह्याचा तपास वस्तुस्थितीदर्शक व योग्य पद्धतीने होत नसल्याने तपास अधिकार्यांकडून काढून घेण्यात यावा व न्यायालयाच्या आदेशाने सदरच्या गुन्ह्याचा तपास अन्य अधिकार्यांकडे सोपविण्यात यावा अशी याचिका अल्ताफखान पठाण यांनी न्यायालयात दाखल केली होती.
तपासाधिकारी बदलण्यासाठी याचिका
याबाबत न्यायालयाने सरकारी अभियोक्ता व तपास अधिकारी यांचा खुलासा आणि म्हणणे मागविण्याचा आदेश केला आहे. तसेच तपास अधिकार्यांनी तपासाची संपूर्ण अस्सल कागदपत्रे आणि गुन्ह्याच्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलिसांच्या गुन्ह्याच्या तपासाकामी न्यायालयाने आदेश करण्याची दुर्मिळ घटना घडली आहे. फिर्यादी अल्ताफखान पठान यांचे वतीने अॅड. मोहन शुक्ला काम पाहत असुन त्यांना अॅड. सुजित पाठक सहकार्य करीत आहे. दर्म्या जुम्मा मस्जिद अपहार व फसवणूक प्रकरणातील दोन्ही संशयितांची जामिनावर मुक्तता झाली आहे.