जुलमी शासनाविरोधात तरुणांनी एकत्र यावे

0

जळगाव। राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर आठ हजार शेतकरी आत्महत्या झाले आहे. शेतकर्‍यांच्या शेती मालाला योग्य भाव नाही, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शुल्क माफी नाही, शासनाने उद्योग वाढीसाठी प्रयत्न केले नसून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे 33 लाख लोकांच्या रोजगारावर गदा आले आहे. या विरोधात तरुणांनी एकत्र येऊन निर्दयी, जुलमी शासनाविरोधात बंड पुकारावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी केले. ते जळगाव येथे राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यालयात शुक्रवारी 5 रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पुढे बोलतांना त्यांनी जनता ही शासनाच्या धोरणाला कंटाळली आहे. जनतेचा विश्‍वास कमवायचा असेल तर मोर्चे, उपोषण, आंदोलन करणे आवश्यक आहे. आगामी 2019 मधील लोकसभा, विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी युवकांच्या जोरावर लढणार आहे. हजारोच्या संख्येने तरुणांनी बंड पुकारला पाहिजे तेव्हाच शासनाला जाग येईल असे नमुद केले.

गटतट विसरुन काम करा
जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची ताकत मोठी आहे. शेतकरी, विद्यार्थी यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी नेहमीच तत्पर असून शासनाला कोंडीत पकडण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत आहे. मात्र पक्षांंतर्गत गटबाजी वाढल्याने अनेकदा यात अडचण निर्माण होते. कार्यरत नसणार्‍यांना संघटनेत कोणतेही स्थान दिले जाणार नाही. जनतेच्या प्रश्‍नासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी गट तट विसरुन एकत्र येऊन कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस मेळाव्याचे आयोजन शहर कार्यालयात करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश देसले, महानगराध्यक्ष परेश कोल्हे, माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, युवराज पाटील, अ‍ॅड.सचिन पाटील, राहूल पाटील, सचिन पवार, यशवंत पाटील आदींसह जिल्ह्याभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.