हवामान विभागाचा उद्या अंदाज
हवामान खात्याच्या अंदाजाकडे बळिराजाच्या नजरा
नवी दिल्ली : यंदा चांगला पाऊस पडणार असल्याची शक्यता खासगी हवामान संस्थांनी व्यक्त केली असतानाच, केंद्रीय हवामान खातेदेखील सोमवारी आपला पहिला अंदाज वर्तविणार आहेत. या अंदाजाकडे देशभरातील बळिराजासह सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. यंदा उत्तम मान्सूनची शक्यता अधिक असल्याचा अंदाज अगोदरच खासगी हवामान संस्थांसह तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच, जून महिन्यात मान्सून केरळला धडकण्याची आणि सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा पाऊस सुरू राहील, असे निरीक्षणदेखील हवामानतज्ज्ञांनी नोंदविलेले आहे.
स्कायमेटनुसार 100 टक्के पावसाची शक्यता
हवामान खाते नैऋत्य मोसमी पावसाबाबत सोमवारी दीर्घ कक्षेचा अनुमान प्रसिद्ध करणार आहे. एप्रिल आणि जूनमध्ये दोन टप्प्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जाणार असून, हवामान विभागाचे महासंचालक के. जे. रमेश सोमवारी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती देतील. खासगी संस्था स्कायमेटने मान्सूनचा अनुमान अगोदरच वर्तविला आहे. स्कायमेटनुसार यंदा मान्सून सरासरीत राहण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर कालावधीत मान्सूनमुळे 100 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. संस्थेने दुष्काळ पडणार नसल्याचा दावा करत शेती तसेच अर्थव्यवस्थेसाठी यंदाचा मान्सून चांगला राहणार असल्याचा अनुमान व्यक्त केलेले आहे.