उरण । उरणच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जागेवर जेएनपीटी बंदराने मागील तीन वर्षात उरण तालुक्यात सामाजिक सुरक्षा फडांतून सुमारे 50 कोटी रुपयांच्या आसपास खर्च केला आहे. मात्र यातील बहुतांशी खर्च हा वृक्षा रोपण आणि संवधर्न, पेस्ट कंट्रोल यांसारख्या गोष्टींवर करण्यात आला आहे. त्यातील काही भाग स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सेवासुविधा पुरवण्यासाठी खर्च करणे आवश्यक होते, अशी इच्छा आता प्रकल्पग्रस्त करत आहेत. उरण सामाजिक संस्थेने जेएनपीटी बंदराकडून माहितीच्या अधिकाराखाली सीएसआर फंडाच्या खर्चाबाबतचा तपशील मिळवल्यानंतर स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
स्थानिकांची केंद्राकडे तक्रार
उरण सामाजिक संस्थेने थेट केंद्राच्या दक्षता विभागाकडे (सेंट्रल व्हिजिलन्स) तक्रार केली आहे. विशेष म्हणजे स्थानिक प्रकल्पग्रस्त गावांमध्येही अनेक समस्या आहेत. या गावांना देखील अगदी प्राथमिक स्वरूपाच्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी निर्माण कारण्याची गरज असताना यापैकी कोणत्याही गावात कोणतेही सामाजिक काम जेएनपीटीच्या सीएसआर फंडातून मागील तीन वर्षात झालेले नसल्याची धक्कादायक माहिती देखील या निमित्ताने समोर आली आहे.
ट्रोमा केअर सेंटरची मागणी प्रलंबित
1 या बंदराच्या निमित्ताने आणखी तीन तीन बंदरे या ठिकाणी वसविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे या बंदराच्या अनुषंगाने विविध गोदामे आणि इत्तर कंपन्या देखील या ठिकाणी वसल्या आहेत. या निमित्ताने तालुक्याचे नंदनवन होणे गरजेचे होते मात्र जेएनपीटी बंदर या ठिकाणी येऊन आता एक पिढी तर गेली असतानाच तालुक्यात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.
2 यामध्ये अवजड वाहतूक आणि बेदरकार वाहनचालकामुळे तालुक्यात सुमारे दिवसागणिक एखादा अपघात होता आहे. अशा अपघातामधील जखमींना चागल्या उपचारांची गरज असताना ते वेळेवर न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये मागील दहा ते बारा वर्षात सुमारे साडेआठशे तरुण रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. त्या अनुषंगाने जेएनपीटीने पुढाकार घेऊन आपल्या सीएसआर फंडातील रक्कम संपवून या ठिकाणी त्वरित उपचार मिळू शकेल असे ट्रामा केअर तरी उपलब्ध करून देण्याची गरज होती मात्र मागील तीन वर्षात असे प्रयत्न झाले नाही.