जेएनपीटीतील क्रेनच्या आगीला कारणीभूत कोण?

0

उरण । शुक्रवारी उरणच्या जेएनपीटी बंदरातील एका आरटीजीसी क्रेन जळून खाक झाली त्याला कोणत्या विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत होता? कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या या नुकसानीला जबाबदार कोण? की केवळ अपघात म्हणून काही अधिकारी संबंधित विभाग अधिकारी आणि कर्मचारी यांना वाचवण्याचे तर आखत नाहीत ना? असे अनेक संशयाचे धुर आता या आगीच्या लोळातून बाहेर येऊ लागले आहेत. शुक्रवारी उरणच्या जेएनपीटी बंदरातील एका आरटीजी सीक्रेनला भीषण आग लागल्याने ती जळून खाक झाली होती.

कोट्यवधींचे नुकसान
परदेशातून आयात कराव्या लागणार्‍या या अशा एका क्रेनची किंमत सुमारे 30 कोटी पासून 60 ते 70 कोटीपर्यंत असू शकते अशी माहिती बंदरातीलच एका अधिकारी व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे बंदराचे झालेले हे कोट्यवधींचे नुकसान कसे काय भरून काढले जाणार, अशा अनेक शंका कुशंका या ठिकाणी विचारल्या जात आहेत. त्याचबरोबर ही आग लागण्याचे कारण काय ? बंदराचा कोणता विभाग याला जबाबदार आहे? जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार का? यासह झालेले नुकसान कोणाकडून भरून काढले जाणार असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत. आधीच सरकारी गुंतवणूक कमी करून देशभरातील बंदरे खासगी लोकांच्या घशात घालण्याचे सरकारच्या स्तरावर घाटात आहे. त्याचाच परिपाक म्हणून कोकणच्या किनार्‍यावर उभी राहत असलेल्या खासगी बंदराच्या पुढे सरकार लाळघोटेपणा करीत आहे. आयपीसीएलसारखा प्रकल्पदेखील सरकारी बांबूच्या उदासीनतेमुळे आपसूकच अंबानी सारख्या भाडंवलदाराच्या हाती यापूर्वीच गेला आहे.

बंदर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार क्रेन नव्हे तर क्रेनला चालविणारे ईजिन जळाले आहे, असे असले, तरीही त्या आगीचा व्हिडिओ पाहता आगीची भीषणता लक्षात येते. बंदरात जागोजागी सेफ्टी फ्रस्ट असे फलक लागलेले असताना आरटीजीसी क्रेन सारख्या महत्त्वाच्या बाबीकडेदेखील ऑपरेशन विभागाच्या अधिकारी वर्गाचे फारसे लक्ष नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी बंदरात बल्क माल यायचा त्यावेळी तो माल वाहून आणणारा पट्टाच अशाच प्रकारे शॉर्टसर्किटने आग लागून खाक झाला होता. त्यावेळी मग संपूर्ण बंदरच केवळ कंटेनर टर्मिनल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याकाळी त्या संपूर्ण यंत्रणा भंगारात काढण्यात आल्या होत्या. या आगीमागे बंदराचे खासगीकरणाच्या बाजूने असलेल्या काही अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष तर याला कारणीभूत नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.