मुंबई- गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. मात्र दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू)त भाजपला विजय मिळविता आलेला नाही. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेहमीच पराभव होत असतो. हा पराभव सततचा आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मतदान ‘ईव्हीएम’द्वारे होत नसल्याने तेथील विजय मिळवणे भाजपसाठी अवघड झाले आहे काय? असा खोचक प्रश्न शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे.
२०१६ मध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याने तीन वर्षानंतर कन्हैया कुमारसह दहा जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. देशविरोधी घोषणांची चौकशी झाली, त्यात ते दोषी आढळले आहे. जर हे पुरावे पक्के असतील तर कन्हैया कुमारच्या बाजूने उभ्या राहिलेल्या प्रत्येकाचेच थोबाड फुटले पाहिजे असेही सामन्यातून सांगण्यात आले आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात माओवादी, नक्षलवादी, कश्मीर आझादीवाल्यांचा अड्डा आहे. मोदी व त्यांच्या भाजपने देश जिंकला असला तरी त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठावर झेंडा फडकवता आला नाही. देशविरोधी घोषणा देणारे मूठभर चळवळे त्यांना आवरत नाहीत व पराभूत करता येत नाहीत. याचा अर्थ या विद्यापीठात शैक्षणिक वातावरण उरले नसून देशद्रोही चळवळय़ांनी येथे वाळवी लावली आहे काय? त्यांचा नेता कन्हैया कुमार हा अचानक देशातील युवकांचा नेता बनतो, हे कसे? असा प्रश्न सेनेने उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राचे एक मंत्री गिरीश महाजन यांनी कालच एका मुलाखतीत जाहीर केले, ;मला कुठेही पाठवा, मी भाजपला विजय मिळवून देईल असे सांगितले होते. आमचे भाजपला आवाहन आहे, गिरीश महाजन यांच्यासारख्या कर्तबगार भाजप मंत्र्याला ‘जेएनयू’मध्ये मुक्कामाला पाठवा व देशद्रोह्यांचा पराभव घडवा. फक्त त्यांना इतकेच सांगा, ‘जेएनयू’मधील निवडणूक ईव्हीएमवर होत नाही.’