जेजुरी । अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या जेजुरी शहर सध्या घाणीच्या विळख्यात सापडले आहे. लवथळेश्वर, विद्यानगर, जुनी जेजुरी या उपनगरात सर्वत्र कचर्याचे ढीग साचले असून नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व ठेकेदाराकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.
या उपनगरामधील कचरा गोळा करण्यासाठी अनेकदा घंटागाडीही येत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. पूर्वीच्या ठेकेदाराकडून घंटागाडी, झाडू मारणार्या महिला, पावडर फवारणी, औषध फवारणी ही कामे वेळच्यावेळी होत असल्याचे ही नागरिकांनी सांगितले. याचाच अर्थ या ठेकेदाराकडून शहराची स्वच्छता होत नसल्याचे यावरून दिसून येत आहे. परंतु पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष का करतात, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रस्त्यावरून वाहते सांडपाणी
जुनी जेजुरी येथे मागील आठवड्यात मैलायुक्त सांडपाणी गटारामधून रस्त्यावर वाहत होते. तर विद्यानगर व लवथळेश्वर परिसरामध्ये गटारे नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असते. यामुळे रस्त्यावर मोठ मोठ खड्डे पडले असून छोटे मोठे अपघात होणे नित्याचेच झाले आहे. धालेवाडी रस्त्याची अवस्था देखील दयनीय झाली आहे. शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. अशा एक ना अनेक समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
विकासकामांचे तीनतेरा
42 वर्ष एकहाती असणारी राष्ट्रवादीची सत्ता या वर्षी नागरिकांनी परिवर्तन करून काँग्रेसच्या हाती दिली. परंतु नगरपालिकेला नगराध्यक्ष व मुख्याधिकारी नसल्यामुळे विकासकामांचा बोर्या वाजला आहे. भविष्यात नागरिकांवर सत्ता परिवर्तन केल्याचा पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये, असे काही नागरिकांनी नावे न छापण्याच्या अटीवर सांगितले.