जेट्टीच्या नावाखाली जागा बळकावण्याचा डाव उधळला

0

मुंबई । पर्यटन जेट्टीच्या नावाखाली गिरगावच्या ऐतिहासिक बिर्ला कला-क्रीडा केंद्राची जागा बळकावण्याचा प्रशासनाचा डाव शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने उधळून लावला. शिवसेनेने जागा देण्यास जोरदार विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव सुधार समितीत बहुमताने नामंजूर करण्यात आला. यामुळे जेट्टीला जागा मिळविण्याचा भाजपच्या प्रयत्नांना सुरुंग लागला. पर्यटनाला चालना देण्यार्‍या जेट्टीसाठी बिर्ला कला-क्रीडा केंद्राची 2791.44 चौ. मीटर जागा मुंबई पोर्ट ट्रस्टला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने भाजपच्या इशार्‍याने सुधार समितीत आणला होता. सदर जागेसाठी भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही असून या जेट्टीमुळे पर्यटनाबरोबरच जलवाहतुकीस चालना मिळून मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी पर्याय प्राप्त होईल, अशी भूमिका भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधर आणि जयंती आळवणी यांनी मंडळी.

मुंबईचे वैभव नष्ट करण्याचा प्रकार
विकासाच्या नावाखाली मुुंबईचे असलेले वैभव नष्ट करायचे आणि हवेतील गोष्टींच्या मागे लागण्याचा हा प्रकार असल्याचे यावेळी सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी सांगितले. आमचा विकासाला विरोध नसून परंपरा जपण्याचीही गरज असल्याने प्रस्ताव नामंजूर केल्याचे सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी सांगितले.

काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेची खेळी
मात्र यावेळी शिवसेनेने जेट्टीसाठी कला-क्रीडा केंद्राचा बळी देऊ नका, अशी भूमिका मांडत या प्रस्तावास विरोध केला. या ठिकाणाशी मराठी-गुजराती कलाकारांची आस्था जोडलेली आहे. त्यामुळे हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोणती पर्यायी व्यवस्था केली आहे का, असा सवाल श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर यांनी केला. या जेट्टीचा उपयोग स्थानिक कोळीबांधवांना होणार का, असा प्रश्‍नही यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे विकासाच्या नावाखाली असलेल्या वास्तूंचा बळी जाऊ देणार नाही, अशी भूमिका मांडत शिवसेनेने या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आजमी, जावेद जुनेजा यांनीही जेट्टीला विरोध केला. त्यामुळे हा प्रस्ताव सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी नामंजूर केल्याचे जाहीर केले.