जेबीजीव्हीएसच्या माध्यमातून 99 शाळांमध्ये पायाभूत सुविधा

0

पिंपरी-चिंचवड : जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेने (जेबीजीव्हीएस) शहरातील 99 शाळांची निवड करून त्यामध्ये पायाभूत सुविधा पूर्तता केली आहे. आवश्यक पायाभूत सुविधा तसेच शाळांमध्ये राबविण्यात येणारे विविध उपक्रम यामुळे शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढत असून त्याचा फायदा 550 पेक्षा अधिक शिक्षक तर 800 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना झाला आहे.

चार शाळांमध्ये बाके, 42 संगणक कक्ष, महाराष्ट्र बोर्डाचा पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम असलेले 59 इ-लर्निंग संच, 62 विज्ञान प्रयोगशाळा, 22 शाळांत वाचनालय कपाटे, पाच शाळांत वाचनालयातील पुस्तके, आठ जलशुद्धीकरण यंत्रे, 40 शाळांत क्रीडा साहित्य, 39 शाळांत बालवाडी साहित्य, 46 ध्वनी यंत्रणा, 36 शाळांत वाद्ये व 37 शाळांत शैक्षणिक साहित्य यांचा समावेश आहे. नोव्हेंबर 2015 पासून बजाज ऑटो सामाजिक बांधिलकी अंतर्गत जेबीजीव्हीएस पिंपरी-चिंचवडमधील शाळांसाठी बजाज शिक्षण उपक्रम (बीइआय) राबवत आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे व पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशातून या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. जेबीजीव्हीएसने केवळ 15 महिन्यांच्या कालावधीत 99 शाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्याने आणखी 25 शाळांकडून प्रस्ताव आले आहेत. त्यांची देखील निवड प्रक्रिया सुरू आहे.