धुळे । मालेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या वादातून काही युवकांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यात एकाने गावठी कट्टा काढून गोळीबारही केला. सुदैवाने जिवीतहानी झाली नसलीतरी भितीयुक्त वातावरण हॉटेल परिसरात मात्र निर्माण झाले होते. शहरातील मालेगाव रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळील एका हॉटेलमध्ये दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन जण गेले होते. यावेळी काही वेळातच जेवणाच्या वादावरुन हॉटेलचा कामगार आणि त्यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. शाब्दीक चकमकीचे पर्यावसन हाणामारीत झाली. यामुळे हॉटेलमध्ये तसेच परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते.
हॉटेल कामगार बेपत्ता
या हाणामारीत खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. हाणामारीत खुर्च्यांची फेका-फेक करण्यात आल्याने नुकसान झाले़ हाणामारीच्या घटनेमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या हाणामारीची खबर त्या दोघांनी काही जणांशी मोबाईलवरून संपर्क साधत कळवत त्यांना घटनास्थळी बोलवून घेतले. ते थोड्यावेळातच काही जण शस्त्रास्त्रसहीत दाखल झाले. यातील एकाने गावठी कट्टाच आणल्याने तणाव अधिकच वाढला होता. त्याने गोळीबार केला. पण, सुदैवाने गोळी कोणालाही लागली नसल्याने जिवीतहानी झाली नाही. घटनास्थळावरुन हुल्लडबाजी करणारे तरुण पळून गेले. याप्रकरणाने भिती निर्माण झाल्याने हॉटेल कामगार देखील बेपत्ता झाला आहे. दुपारी गोळीबाराचा आवाज आल्याने परिसरात घबराहट पसरली होती. या हाणामारीने परिसरात दहशत निर्माण झाली होती.
पोलिसांचा गोळीबार नसल्याचा संशय
घटनेचे वृत्त कळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ हे आपल्या पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी प्राथमिक तपासणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजचे संकलन केले जाणार असून त्याद्वारे अधिक माहिती समोर येण्यास मदत होणार आहे. दरम्यान, हॉटेलमध्ये दहशत माजवित धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न झाला. गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. वस्तुत: तसे काही दिसत नसले तरी तपासणीतून ही बाब समोर येईल. सीसीटीव्हीचे फुटेजची पाहणी केली जाईल, असे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी सांगितले. पोलिसांसमोर बेपत्ता कारागिर शोधण्याचे आव्हान आहे.