भुसावळ : हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण न दिल्याचा राग अनावर झाल्याने शहरातील हॉटेल व्यावसायीकावर दोघांनी लोखंडी फायटर व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत हल्ला केल्याची घटना सोमवार, 27 रोजी दुपारी 1.35 वाजता रजा टॉवरजवळ घडली. या घटनेत तक्रारदार व हॉटेल व्यावसायीक सारंगधर महादेव पाटील (50, गुंजाळ कॉलनी, खडका रोड, भुसावळ) हे जखमी झाले आहेत. पाटील यांनी मंगळवारी रात्री बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार दोघा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
जेवण न दिल्याने हॉटेल व्यावसायीकावर हल्ला
तक्रारदार सारंगधर पाटील यांच्या तक्रारीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल खालसा पंजाब नामक त्यांच्या हॉटेलवर सुमारे पाच दिवसांपूर्वी दोन तरुण रात्री 12 वाजेनंतर आल्यानंतर त्यांनी जेवण मागितले मात्र हॉटेल बंद झाल्याने आता जेवण देता येणार नाही, असे सांगितल्यानंतर संबंधीत तरुण निघून गेले मात्र जेवण न दिल्याचा राग डोक्यात ठेवून संशयीत एजाज खान उर्फ सोन्या अयुब खान (27, इमलीपुरा, नॅशनल हायवेजवळ, भुसावळ) व शाहरूख खान इकबाल खान (24, जाम मोहल्ला, भुसावळ) यांनी सोमवार, 27 रोजी दुपारी 1.35 वाजता रजा टॉवरजवळ सारंगधर पाटील आल्यानंतर त्यांना अडवत लाथाबुक्क्यांनी व फायटरने मारहाण सुरू केली. लोखंडी फायटरचा वार छातीवर लागल्याने सारंगधर पाटील यांची बरगडी फ्रॅक्चर झाली तसेच संशयीतांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बाजारपेठ पोलिसांनी दोघा संशयीतांना अटक केली. तपास प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.