… जेव्हा शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील; तेव्हाच येतील ‘अच्छे दिन’!

0

मुळशी । जेव्हा शेतकर्‍यांची आत्महत्या थांबेल, तेव्हा अच्छे दिन येतील. स्वातंत्र्य मिळूनही 70 वर्षे झाली. तरीही शेतकरी राजाचे प्रश्‍न काही सुटत नाहीत. हे आपल्या देशाचे आणि देशातील लोकशाहीचे दुर्दैव आहे, असे मत सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित यांनी व्यक्त केले. शब्दधन काव्यमंचातर्फे आयोजित ’जीवा शिवाची बैलजोड, कविता सांगतीया थोडं’ कवि संमेलन मुळशी तालुक्यातील जांबे गावात भरविण्यात आले होते. हे कवीसंमेलन बैलगाडीत घेण्यात आले. या संमेलनात बळीराजा व बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

जय जवान जय किसानचा नारा
राया नका करू कुणाची पर्वा मला उसाच्या फडात मिरवा, नातं घट्ट त्याचं आणि माझं खाते आर्धी भाकर चिकटली जशी बाई जोंधळ्याला साखर, बाया वेचीत मोगरा, कुणी घालतिया सडा, फेसाळतं काठोकाठ, राधा काढतीया धारा, या आणि अशा बहारदार रचना कविंनी सादर केल्या. तसेच राधाबाई वाघमारे, मधुश्री ओव्हाळ, भाऊसाहेब गायकवाड, मानसी चिटणीस, शरद सेजवळ, बाळासाहेब घस्ते यांनी आपल्या कवितेतून, खेड्याकडे चला, जय जवान जय किसान, देशाचा पोशिंदा बळीराजाची आठवण ठेवा, शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, असा संदेश आपल्या कवितेतून दिला. या कार्यक्रमाचे संयोजन अरुण परदेशी, विजय चौधरी, मुरलीधर दळवी, उमेश सणस, शामराव साळुंके यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुभाष चव्हाण यांनी केली सूत्रसंचालन प्रदीप गांधलीकर यांनी केले. आभार वैशाली चौधरी यांनी मानले.

काव्यातून मांडल्या शेतकर्‍यांच्या व्यथा
बाजार मालाला भाव द्या हो, रीन काढू किती. कांद्यात पाणी भरताना, घाम आला किती अशी मागणी शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी कवितेतून केली. जरी घाम गाळून पिकावेत मोती, तरी मोल कवडीसवे पाहतो मी, असे दिनेश भोसले यांनी व्यक्त केले. आय के शेख यांनी किती सुंदर जांब्याचे गाव, लई आलाय आंब्याला भाव, सविता इंगळे यांनी काळ्या मातीत दडलया सोन्या चांदीच्या खाणी, दोघे मिळून करु चला, शेतात नांगरणी खुरपनी, माधुरी विधाटे यांनी नको करू आत्महत्या विनविते मी भगिनी, शेतकरी बंधूराजा, घाल हीच ओवाळणी, नंदकुमार मुरडे यांनी मनाने निरोगी, विचारे निरोगी हा देश, हे विश्‍व, करी तू निरोगी अशा प्रकारच्या विविध काव्य पंक्तीतून शेतकर्‍यांच्या व्यथा मांडण्यात आल्या.

शेतकरी आणि कवी एकसमान
शेतकरी आणि कवींमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे शेतकरी मातीत बियाणे पेरतो तर कवी समाज मनामधे नव्या विचारांचे बीज पेरतो. माती आणि माता यात फक्त एका वेलांटीचाच फरक असतो. मातेच्या गर्भातून प्रत्येकजण मातीच्याच गर्भात जात असतो, असे दीक्षित यांनी सांगितले. जांबे गावचे सरपंच अंकुश गायकवाड, रंजना गायकवाड, विलासराव देंडगे व तसेच गावकरी, शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी गावातील सुवासिनींनी झूल टाकून सजविलेल्या बैलांची पूजा केली.