मुंबई : श्रीमती संगीता राजेश महाजन 17 जुलै रोजी जळगांव येथे बाजारात गेल्या असतांना त्यांना मोटारसायकलने जोरदार धडक दिली. त्यानंतर त्या जळगांव येथे तीन दिवस उपचार घेत होत्या. बेशुद्ध झाल्याने त्यांना 20 जुलैला रात्री मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तपासणीनंतर संगीता यांचा ब्रेन मृत पावत असल्याचे जे.जे. रुग्णालयातीस डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना अवयव दानासाठी विचारपूस केली. पण नातेवाईकांना तयार करण्याचे अवघड काम आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी केले. संतोष आंधळे यांनी सर्व संपर्क व्यवस्था पाहिली. सर्व तपासण्या झाल्यानंतर लिव्हर व डोळे दान करण्यात सर जे.जे. रुग्णालयातील टीमला यश आले.
10 वर्षांची मुले पोरकी
सर जे.जे. रुग्णालयात ब्रेन डेड घोषित होत असत पण नातेवाईक तयार होत नसल्याने अवयव दान करता येत नव्हते. संगीता यांचे लिव्हर ज्युपिटर रुग्णालयास व डोळे सर जे.जे. रुग्णालयास देण्यात आले. राजेश महाजन यांच्या आईचे त्या 10 वर्षांच्या असतांना निधन झाले होते. त्यांच्या मुलांनाही दहाव्या वर्षीच आईचे छत्र गमवावे लागले. हा एक दुर्दैवी योगायोग आहे.
मनावर दगड ठेवून घेतला निर्णय
जे.जे. रुग्णालयातील डॉ. कमलेश, डॉ. भोसले, डॉ. सचिन, डॉ. ऊषा, डॉ. प्रिया व डॉ. संजय सुरासे व जे.जे. अवयवदान टीमने यासाठी खूप परिश्रम घेतले. आपली पत्नी मृत्यूच्या दारात व आपली मुले पोरकी होणार हे माहित असूनही राजेश महाजन यांनी अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेउन इतरांनाही चांगला मार्ग दाखवल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. गिरीशभाऊ महाजन यांच्या अवयवदान करण्याच्या आव्हानांमुळे प्रेरीत होऊन आपण हा निर्णय घेत असल्याचे राजेश महाजन यांनी सांगितले.