जे टी महाजन इंग्लिश मेडियम स्कूल येथे रक्षाबंधन उत्साहात साजरी

न्हावी प्रतिनिधी दि 29

भारतीय सण उत्सव परंपरेतील भाऊ बहिणीच्या नात्याचे सस्नेह व्यक्त करणारा रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण म्हणून सर्वत्र मोठा उत्साहात साजरा केला जातो. यास अनुसरून रक्षणाचे बंधन बांधणारा हा सण जे टी महाजन इंग्लिश मेडियम स्कूल फैजपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी व्यासपीठांसमोरील वृक्षरोपट्यास रक्षाबंधन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विद्यालयातील उपशिक्षिका कविता चौधरी यांनी रक्षाबंधन निमित्त व्यक्त केलेल्या आपल्या मनोकातून भाऊ बहिणीच्या प्रेमाचे अतूट नाते आणि भावाकडून होणाऱ्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी यावर भाष्य करत भगवान श्रीकृष्ण व द्रोपदी यांचा दृष्टांत सांगितला. तर सागरी तटावर वावरणारा कोळी बांधव या निमित्ताने वरुण राजांची नारळाने पूजा करतो म्हणून या सणास नारळी पौर्णिमा या नावाने ही ओळखले जाते. सोबतच आपल्या वसुंधरेला सुरक्षित ठेवण्याची ही जबाबदारी आपलीच आहे असा विचार व्यक्त करत वृक्ष रक्षाबंधनाचेही महत्त्व वर्णन केले. तसेच विद्यार्थी अवस्था ज्ञानार्जनाशी संबंधित आहे म्हणून वही व पेन यांनाही राखी बांधून स्नेहभाव व्यक्त करण्यात आला.

तद्नंतर विद्यालयातील विद्यार्थिनी नाविन्या बोरोले, चंचल चौधरी, खुशबू पाटील, जिज्ञासा ढाके यांनी विद्यार्थी लुकेश पाटील, मोहित पाटील यांना राखी बांधून विधीवत पूजन केले. व यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी भगिनींनी आपापल्या वर्गातील विद्यार्थी बांधवांना प्रत्यक्ष राखी बांधून सामूहिकरीत्या रक्षाबंधनाचा आनंद घेतला.

विद्यालयातील कला शिक्षिका वैशाली किरंगे यांनी फलक चित्रणाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पृथ्वीरुपी बहिणीची चंद्रयान-३ ही राखी लाडक्या चंदा मामा पर्यंत पोहोचविण्यात आली; असे वैज्ञानिकांसह राखी व चंद्रयान-३ चे विहंगम चित्र रेखाटले.

कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मोझेस जाधव, विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका कविता जावळे यांनी केले तर उपशिक्षिका सायली कोळी यांच्या आभारांती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.