जे.टी.महाजन तंत्र निकेतनच्या प्राचार्यासह तीन प्राध्यापकांविरुद्ध गुन्हा

0

विद्यार्थ्याची रॅगिंग भोवली ; शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ

फैजपूर- ऑनलाईन पद्धतीने इंजिनिअरींगच्या सरळ दुसर्‍या वर्षात प्रवेश मिळाल्याच्या कारणावरून राग आल्याने विद्यार्थ्याला टोचून बोलून, अपमान करून द्वेष भावनेने रॅगिंग करून परीक्षेस बसू दिले नाही म्हणून फैजपूर येथील जे.टी.महाजन तंत्र निकेतनच्या प्राचार्यासह तीन प्राध्यापकांविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 17 ऑगस्ट 2018 ते 17 ऑक्टोबर 2018 च्या दरम्यान जे.टी.महाजन तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थी शेख अशपाक शेख शकील (मिल्लतनगर, फैजपूर) यास महाविद्यालयाचे प्राचार्य पी.बी.पाटील ,विभाग प्रमुख प्रा.एस.एन.चौधरी, प्रा.वजाहाद सैय्यद, प्रा.पी.डी.फेगळे यांनी विद्यार्थी शेख अशपाक शेख शकील यास ऑनलाईन पध्दतीने इंजिनिअरिंगच्या सरळ दुसर्‍या वर्षात प्रवेश मिळाल्याचे कारणावरून तुला प्रवेश कसा काय मिळाला? असे म्हणत तुझी इंजिनिअरींगला बिलकुल लायकी नाही, तू बिनडोक आहे, तू नापास होणारा आहे, तुला परीक्षेला बसू देणार नाही, तुला डिटेन केल्याशिवाय राहणार नाही असे टोचून बोलून, अपमान करून द्वेष भावनेने या विद्यार्थ्याची रॅगिंग करून परीक्षेस बसू न देता पूर्वनियोजित कट करून खोलीत डांबून ठेवली तसेच विद्यार्थ्याचे करीअर खराब करून बदनामी करून फी बाबत विद्यापीठाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघण करून फसवणूक केल्याने प्राचार्यासह विभाग प्रमुख व दोन प्राध्यापक अशा चौघांविरुध्द फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहे.

कुठल्याही विद्यार्थ्याविषयी द्वेष नाही -प्राचार्य
शेख अशपाक या विद्यार्थ्याचे सबमिशन पूर्ण नसल्यामुळे त्याला नियमानुसार परीक्षा देता आली नाही. आमचा संबंधित विद्यार्थ्याविषयी कुठलाही राग अथवा द्वेष नाही, असे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य पी.बी.पाटील म्हणाले.