भुसावळ प्रतिनिधी दि 5
गुरु शिष्य परंपरा ही अनादी अनंत कालापासून आजवर अविरत महत्व प्राप्त करणारी आहे याचाच परिपाक म्हणजे ५ सप्टेंबर अर्थात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अखंड भारतात शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर जे टी महाजन इंग्लिश मेडियम स्कूल व सेमी इंग्लिश मेडियम स्कूल फैजपूर येथे विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरेचा अलौकिक मेळ घडवून आणण्याचा विचाराने उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा नरेंद्र विष्णू नारखेडे ( क.ब.चौ. उ म वी जळगाव, सिनेट सदस्य) यांच्या हस्ते विद्येची आराध्य देवता सरस्वती माता व तत्त्वज्ञ , तत्त्ववेत्ते, शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर विद्यालयातील इ.१० वी चा विद्यार्थी गोपाल नंदकिशोर अग्रवाल याने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान व शिक्षक जीवनाचा शिल्पकार यावर आपले विचार अभिव्यक्त केले . तसेच सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मधिल इ.९ वी ची विद्यार्थिनी आकांक्षा लिलाधर धांडे हिने शिक्षक दिनानिमित्त आपले मत व्यक्त करताना एक विद्यार्थी म्हणून शिक्षकांशी आलेला सहसंबंध व त्यातून आलेला अनुभव व्यक्त केला. तसेच शिक्षकांच्या ज्ञानातून मिळणारा मार्ग हा विद्यार्थ्यांचे जीवन सफल करणारा असतो असे मनोगत व्यक्त केले.
यानंतर जे टी महाजन सेमी इंग्लिश मेडियम स्कूलचे प्राचार्य नंदकिशोर सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत एक शिक्षक म्हणून आपले विचार अभिव्यक्त केले. सोबतच साने गुरुजी, डॉ एपीजे अब्दुल कलाम अशा महान व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे देत एक शिक्षक म्हणून आपले कर्तव्य व जबाबदारी ही एकनिष्ठेची बाब प्रत्येक शिक्षकाने आत्मसात केली पाहिजे ; त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनीही आपल्या जीवनातील शिक्षकांना आपला मार्गदर्शक समजून त्यांच्या आज्ञेचे योग्य ते पालन करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. तदनंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा नरेंद्र विष्णू नारखेडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. राधाकृष्णन यांनी जगलेले जीवन एक शिक्षक म्हणून त्यांची कामगिरी तसेच भारतातील उच्च पदांसह विदेशातही आपल्या ज्ञानाच्या जोरावर विविध ठिकाणी आपली छाप निर्माण केली. म्हणून राधाकृष्णन यांचे ज्ञान व शिक्षणाप्रती असलेले अलौकिक विचार आजच्या पिढीने आचरणात आणून आपले आयुष्य यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर जे टी महाजन इंग्लिश मेडियम स्कूलचे प्राचार्य मोझेस जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून शाळेची आत्तापर्यंतची वाटचाल व शिक्षकांनी घेतलेली मेहनत यावर भाष्य करत विद्यालयातील सर्व शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी व सदैव तत्पर आहेत याचा सार्थ अभिमान व्यक्त केला. तसेच आयुष्यात मिळालेल्या अनेकविध अनुभवांतून विद्यार्थी म्हणून जगताना व शिक्षक म्हणून जगताना समाजाचे देणे लागते हा विचार जगला तर निश्चितच येणारी पुढच्या पिढीचे भविष्य उज्वल करता येईल व भारताला अधिक सक्षम बनवता येईल असे विवेक विचार व्यक्त केले.
यानंतर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांना सन्मानित करण्यात आले. सन्मान स्वरूप म्हणून विद्यालयातील शिक्षकांनी स्वहस्ते बनविलेले पुष्पगुच्छ सोबत पेन चे पाकीट भेटवस्तू अशी भेट देत सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा होणारा सन्मान मोठ्या स्नेहदृष्टीने अनुभवला.
कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा नरेंद्र विष्णू नारखेडे, प्राचार्य मोजेस जाधव( इंग्लिश मेडियम ), प्राचार्य नंदकिशोर सोनवणे( सेमी इंग्लिश मेडियम) पर्यवेक्षिका पूनम नेहेते विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका स्नेहल ब-हाटे यांसह विद्यार्थी दर्शन चौधरी, खुशबू पाटील, नम्रता इंगळे व ओम चौधरी यांनी केले तर विद्यार्थिनी पुर्वा इंगळे हिच्या आभारांती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.