शिक्षण संस्थांद्वारे कारखानदारीची गरज पूर्ण व्हावी
माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी व्यक्त केली अपेक्षा
पिंपरी चिंचवड : सुशिक्षित बेरोजगार पदवीधरांसाठी तसेच इतर क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या तरुणांना रोजगार मिळावा, कारखानदारीत असलेली गरज शिक्षण संस्थाद्वारे पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी केली. चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट तर्फे दोन दिवसीय प्रतिभा जॉब फेअर 2019 चे आयोजन संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, पुणे फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जाझिंग लाईव्हस आणि लायन्स क्लब तळेगाव हे सहप्रायोजक असलेल्या जॉब फेअरचे उद्घाटन कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती…
पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राजेश पांडे, परिमंडल 1 चे पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, लायन्स क्लबचे प्रान्तपाल रमेश शहा, जॉब फेअरचे स्वागताध्यक्ष डॉ. दीपक शहा, संचालिका भुपाली शहा, एम.एच.आर.डी. चे सचिव अमन राजाबली, शिवाजी विद्यापीठातील प्लेसमेंट विभागाचे डॉ. गजानन राशिनकर, अधिष्ठता ए.एम. गुरव, फ्युएलचे संस्थापक अनुज रवींद्र, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, संचालक डॉ. सचिन बोरगावे, डॉ. जे.डी. टाकळकर, डॉ. के.आर. पाटेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हे देखील वाचा
गुन्हेगारी क्षेत्रात युवकांची वाढती संख्या…
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, आज गुन्हेगार क्षेत्रात 18 ते 25 वयोगटातील युवकांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यांच्यावर एकदा गुन्हा दाखल झाला तर, त्या युवकाचे आयुष्य उद्धस्त होते. याची खंत वाटते. यासाठी युवकांनी चुकीच्या मार्गाने जाता कामा नये. आज बेरोजगारांची संख्या लक्षणिय असली तरी, संघर्षाशिवाय जीवनात कोणालाच यश मिळविता येत नाही. क्षेत्र कोणतेही असो, यश मिळविण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो.
नोकरीसाठी 14 हजार 208 जणांची नोंदणी…
राजेश पांडे म्हणाले, भारत देशात आज एकूण लोकसंख्येपैकी 80 कोटी युवकांची संख्या आहे. जगात सर्वात जास्त युवा शक्तिचा देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. देशात प्रचंड बेरोजगारी वाढत आहे. असे असले तरी होतकरू युवकांना जगभरात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. शहा यांनी केले. जॉब फेअरसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला 14 हजार 208 जणांनी नोंदणी केल्याचे त्यांनी नमूद केले. 218 कंपन्यांचा यात सहभाग असून, 15 हजार नोकर्या या जॉब फेअरच्या माध्यमातून विविध क्षेत्रात मिळणार आहे.
नामवंत कंपन्यांचा सहभाग…
या जॉब फेअरमध्ये बजाज ऑटो, टेक महिंद्रा, थरमॅक्स, रिलायन्स इन्श्युरन्स, एअरटेल, जयहिंद इंडस्ट्रिज, बॉश कंपनी, टाटा केमिकल, इन्फोसिस, बॉम्बे स्टॉक एक्सेंज आदी कंपन्यांचा सहभाग असून कलकत्ता, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, देवगड, ठाणे, मुंबई, लोणावळा पुणे जिल्ह्यातील युवक युवतींनी नोकरीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्हाडे यांनी तर आभार डॉ. जयश्री मुळे यांनी मानले. जॉब फेअर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा. हर्षिता वाच्छानी, प्रा. गुरूराज डांगरे, प्रा. हनुमंत कोळी, प्राध्यापिक रुपाली प्रभुगावकर, विशेष परिश्रम घेत आहेत.