जळगाव। पावसाळा सुरु होण्याअगोदर हवामान खात्याच्या अंदाजानुसार यार्षी चांगल्या पावसाचे संकेत देण्यात आले होते. 30 मे रोजी मान्सुन केरळात दाखल झाला त्यानंतर राज्यासह जिल्ह्याभरात चांगला पाऊस झाला. मान्सुनपूर्व पाऊस चांगला झाल्याने शेतकर्यांनी कापूस बियाण्याची लागवड केली त्यानंतर जवळपास तीन आठवडे पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दरम्यान मध्यंतरी काही ठिकाणी पुन्हा पाऊस सक्रीय झाल्याने काही ठिकाणी दुबारचे संकट टळले होते. मात्र आठवड्याभरापासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिली. शनिवारी 22 रोजी जिल्ह्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. जिल्ह्यात सर्वदुर पाऊस झाले नाही. तुरळक पाऊस असल्याने अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. काही ठिकाणी तर तीसर्यांदा पेरणीचे संकट ओढवण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र आहे.
अडावदला जोरदार
अडावद येथे शनिवारी सायंकाळ 5 वाजात पाऊस सुरु झाला. जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला. रात्रीपर्यत रिमझिम रिमझिम सुरुच होते. अडावद परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने पिकासाठी उत्तम पाऊस आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पावसाला सुरुवात झाले.
गिरणेचा साठा 31 टक्के
चाळीसगाव तालुक्यात जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम असली तरी नाशिक येथे जोरदार पाऊस झाल्याने गिरणा नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. गिरणेचा जलसाठा 31 टक्के झाला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. मात्र तालुक्यातील पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असून शेतकर्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे.
पाणी टंचाई
पाचोरा तालुक्यातील अग्नावती धरणात 0 टक्के जलसाठा आहे. पिण्याचे पाणी देखील आठवडे बर येत नसलयाने पाण्याची टंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. नगरदेवळा परिसरात पाऊसाची अद्यापही प्रतिक्षा असून तीबार पेरणीचे संकट ओढवण्याचे चित्र आहे. पावसा अभावी पिके धोक्यात येण्याची शक्यता असून शेतकरी चिंतीत आहे. फैजपूर, अमळनेर, धरणगाव, पाळधी, शेदुर्णी येथे पाऊस झालेला नसल्याने अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे.