जोश्ना चिनप्पा-दीपिकामध्ये सर्वोत्तम क्षमता

0

ग्रेटर नोएडा । स्क्वॉशमधील भारताच्या अव्वल खेळाडू जोश्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लीकल या खेळाडूंमध्ये सर्वोत्तम खेळण्याची क्षमता आहे त्यामुळे त्या दोघीही महिलांच्या जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम पाच क्रमांकापर्यंत मजल मारू शकतात, अशा शब्दांत भारतीय स्क्वॉश संघाचे मुख्य प्रशिक्षक अचराफ एल कारागुई यांनी दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले. वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेला शुक्रवारी सुरुवात झाली. त्या वेळी कारागुई यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. जोश्ना आणि दीपिका यांनी या आधी जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम दहा खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. केवळ या दोन भारतीय महिला स्क्वॉशपटूंनीच आतापर्यंत अशी कामगिरी करून दाखवली आहे. पण त्यांना या क्रमवारीतील एलिट क्लब अर्थात, सर्वोत्तम पाच क्रमांकांवर स्थान मिळवता आलेले नाही. जागतिक क्रमवारीत सध्या जोश्ना 14 व्या तर दीपिका 22 व्या स्थानी आहे. कारागुई म्हणाले, ‘सर्वोत्तम पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये नक्की आहे.

जोश्ना सध्या कारकिर्दितील सर्वोत्तम खेळ करत आहे आणि तिची तंदुरुस्तीही उत्तम आहे. दीपिकामध्येही प्रचंड कौशल्य आहे आणि तंदुरुस्ती सुधारण्यासाठी तीही खूप परिश्रम घेत आहे.’ ‘ पुढची पाच ते सहा वर्षे या दोघीही खेळतील असे मला स्पष्ट दिसत आहे.

दीपिका दीर्घकाळापासून प्रो टूरमध्ये खेळत आहे. ती केवळ 25 वर्षांची आहे. जोश्ना 30 वर्षांची आहे आणि स्क्वॉशमध्ये जेव्हा खेळाडू तिशीत असतो तेव्हा तो सर्वोत्तम कामगिरी करतो. साधारणपणे गेल्या 12 महिन्यांपासून ती उत्तम खेळते आहे,’ असेही कारागुई म्हणाले. एका वर्षापूर्वी कारागुईंची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या वर्षी जुलैमध्ये कारागुईंनी ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर वरिष्ठ आणि कनिष्ठ दोन्ही संघांच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.

या वर्षी प्रतिष्ठेची आशियाई चॅम्पियनशिप जिंकण्यापूर्वी जोश्नाने जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम 10 खेळाडूंत स्थान मिळवले होते. व्ही. सेंथिलकुमारने 19 वर्षांखालील गटात अभय सिंगवर मात करत प्रतिष्ठित ब्रिटिश ज्युनिअर ओपन स्पर्धेचे विजेतपद पटकावले होते.