जो जिता वही सिकंदर

0

विशाखापट्टणम । भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा आणि निर्णायक सामना आज बाराबत्ती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मालिकेतील प्रत्येक एक सामना जिंकून दोन्ही संघ आता 1-1 अशा बरोबरीत आहेत. ऑक्टोबर 2015 नंतर प्रथमच मायदेशात मालिका गमावण्याचे दडपण भारतीय संघावर आहे. दुसरीकडे श्रीलंकेला पहिल्यांदाच भारतात मालिका जिंकण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे रविवारी होणार्‍या सामन्यात जो संघ जिंकेल, तोच सिकंदर ठरणार आहे. कोहलीच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करत असलेल्या रोहित शर्माच्या द्विशतकामुळे भारताने दुसर्‍या सामन्यात 141 धावांनी विजय मिळवत मालिकेत आपले आव्हान कायम राखताना मालिकेत बरोबरी साधली. मालिकेतील धर्मशाळा येथे झालेला पहिला सामना श्रीलंकेने 7 विकेट्सनी जिंकला होता. दोन्ही संघांसाठी करो या मरो अशा स्थितितल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला या निर्णायक सामन्यात दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना पहिला सामना हरल्यामुळे आयसीसीच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळवण्याची भारताची संधी हुकली आहे. हा सामना ही हरल्यास 2015 नंतर घरात मालिका हरल्याचे विष रोहितला प्यावे लागणार आहे. भारताने घरच्या मैदानावर दक्शिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची मालिका गमावली होती. त्यानंतर भारताने मायदेसात मालिका गमावलेली नाही. त्यामुळे नेतृत्व करता येते, अशी टीकाही रोहितला सहन करावी लागेल. दोन्ही संघांमधील खेळलेल्या नऊ मालिकांपैकी आठ मालिका भारताने जिंकल्या आहेत, तर एक मालिका अनिर्णीत राहिली.

वर्चस्व गाजवण्यास भारत उत्सुक
पहिला सामना हरल्यानंतर भारतीय संघाने दुसरा सामना मोठ्या फरकाने जिंकत आपली गाडी लगेचच रुळावर आणली. रोहितच्या द्विशतकासह, शिखर धवनने अर्धशतक, तर श्रेयस अय्यरने 88 धावा करत निवडसमितीचे लक्ष वेधून घेतले आहे. मधल्या फळीत दिनेश कार्तिक, मनीष पांडेला चांगली खेळी करावी लागेल. महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पंड्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. पांडे किंवा कार्तिक खेळल्यास अजिंक्य रहाणेला या सामन्यातही बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. या सामन्यातही भारतीय गोलंदाज सातत्य राखतील, अशी आशा आहे.

अँजेलो मॅथ्यूज फिट
मोहाली वनडेत शतक ठोकणारा श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून तो तिसर्‍या आणि निर्णायक वनडे निवडीसाठी उपस्थित राहणार आहे. दुसर्‍या वनडे सामन्यात मॅथ्यूजला स्नायूंवर तणाव आल्याने त्रास झाला होता. आज संघासोबत सराव करताना मॅथ्यूज दिसला. मॅथ्यूज फिट असून तो निर्णायक सामन्यासाठीच्या निवडीसाठी उपलब्ध असणार असल्याचे टीम मॅनेजर अशांका गुरुसिंघे यांनी सांगितले. मॅनेजर म्हणाले, मॅथ्यूज फिट आहे. गेल्या सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये त्याला मांसपेशी खेचल्या गेल्याने त्रास झाला होता. मात्र त्या दुखापतीतून आता तो सावरलाय. आज त्याने नेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी सरावात सहभाग घेतला. संघातील 15 खेळाडू फिट आहे आणि निवडीसाठी तो उपलब्ध असणार आहे.

टी-20 मालिकेसाठी लसित मलिंगाला डच्चू
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी श्रीलंका टीममधून लसित मलिंगाला डच्चू देण्यात आलाय. दरम्यान, सीनिअर खेळाडू सुरंगा लकमल आणि लाहिरू थिरिमाने यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारताविरुद्ध 20 डिसेंबरपासून टी-20 मालिका सुरु होत आहे. या मालिकेसाठी लसित मलिंगाला वगळल्याने श्रीलंकेची गोलंदाजी कमकूवत झालेय. अनुभवी वेगवान गोलंदाज लसित मलिंगाला श्रीलंका संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे संघ जाहीर करण्यात आला नव्हता. दरम्यान, श्रीलंकन क्रीडामंत्री धनंजय जयसेकरा यांची मंजुरी मिळाल्यानंतर संघ जाहीर करण्यात आला. दरम्यान, श्रीलंकेकडून मलिंगाला विश्रांती देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, त्यासाठी कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. मलिंगा बांग्लादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळत आहे. सुरंगा लकमल आणि लाहिरू थिरिमाने यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर विश्‍व फर्नांडो आणि दासून शनाका यांची निवड करण्यात आली. पहिला टी-20 सामना 20 डिसेंबर रोजी कटकमध्ये खेळल्या जाणार आहे. त्यानंतर 22 डिसेंबरला इंदूरमध्ये दुसरा तर 24 डिसेंबरला मुंबईमध्ये तिसरा सामना होणार आहे. श्रीलंका संघ – थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुलास परेरा, दनुष्का गुणतिलक, निरोशन डिकवेला, असेला गुणरत्ने, सदीरा समरविक्रम, दासून शनाका, चतुरंगा डिसिल्वा, सचित पतिराणा, धनंजय डिसिल्वा, नुवान प्रदीप, विश्‍व फर्नांडो, दुशमंत चमिरा.

तिसर्‍या सामन्यासाठी उभय संघ
भारत : रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, एम. एस. वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्‍वरकुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अजिंक्य रहाणे, सिद्धार्थ कौल, अक्शर पटेल.

श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, धनुष्का गुणतालिका, लाहिरु तिरिमन्ने, असेला गुणरत्ने, सदिरा समरविक्रमा, निरोशन डिक्वेला, धनंजय डिसिल्वा, अ‍ॅजेलो मॅथ्यूज, सचित पतिराना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, अकिला धनंजय, चतुरंगा डिसिल्वा, दुष्मंता चामिरा, कुसल परेरा.