ज्ञानाची कास धरून किर्तनाचा प्रसार केला पाहिजे – यशोधन साखरे महाराज

0

पुणे कीर्तन महोत्सवात दिग्गज कीर्तनकारांचा सन्मान सोहळा

पुणे : विज्ञानाने जे आज सिध्द केले आहे, ते अध्यात्मात पूर्वीच सांगितले आहे. आजच्या तरुण कीर्तनकारंनी परंपरेला आधुनिकतेच्या चौकटीत आणले आहे. कीर्तन परंपरा पुढे न्यायची असेल तर कीर्तनात देखील आधुनिकता आली पाहिजे, ते आजचे तरुण कीर्तनकार करीत आहेत. अध्यात्म आणि विज्ञान या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून विज्ञानाची कास धरून कीर्तन कला आणि अध्यात्माचा प्रसार केला पाहिजे, असे मत ह.भ.प यशोधन महाराज साखरे यांनी व्यक्त केले.

शनिवारवाड्याच्या प्रांगणात शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे पुणे कीर्तन महोत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या महोत्सवात दहा प्रख्यात कीर्तनकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, भागवताचार्य ह.भ.प प्रकाश महाराज मुळे (गोंदीकर) आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

अभिनय कामापुरता असावा

कीर्तनात नय (ज्ञान) विनय आणि अभिनय असला पाहिजे. नय आणि विनयाला प्राधान्य देत अभिनय हा कामापुरता असला पाहिजे. परंतु हल्ली नय आणि विनयापेक्षा अभिनयाला प्राधान्य दिले जाते आणि कीर्तनात फक्त अभिनय राहतो. असे न करता कीर्तनकाराने कीर्तन करताना श्रोत्यांच्या मनात भगवंताची अभिव्यक्ती झाली पाहिजे, असे यशोधन साखरे महाराज
यांनी सांगितले.

कीर्तनाची परंपरा जपा

जेव्हा पुरुषार्थ आणि परमार्थाची सांगड घातली जाईल तेव्हा कीर्तनाची परंपरा अखंडपणे मिरवली जाईल. परंपरेत अध्यात्मिक गोष्टीबरोबर आधुनिकता देखील आली पाहिजे असे रामचंद्र देखणे यांनी यावेळी सांगितले.