ज्ञानेश्वरी पारायण व राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवास प्रारंंभ

0

मुक्ताईनगर : संत मुक्ताबाई संस्थान कोथळी येथे नविन मुक्ताबाई मंदीरावर सदगुरू जोग महाराज क्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्था शताब्दी महोत्सवानिमीत्त मंगळवार 10 पासून भव्य ज्ञानेश्वरी पारायण व राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवास पहाटे 5 वाजता काकडआरती व महापूजेने शुभारंभ झाला. सोहळ्याची जय्यत तयारी झालेली असुन पंचक्रोशीतुन भाविकांची उपस्थिती उल्लेखनिय आहे. या नयनरम्य सोहळ्यात राज्यभरातील नामांकित किर्तनकारांच्या सुश्राव्य किर्तनांची पर्वणीच वारकरी, भाविकांना लाभणार आहे.

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमांचे नियोजन
सदर सप्ताह नविन मुक्ताबाई मंदीर येथे होत असुन या सप्ताहात पहाटे 4 वाजता काकड आरती, सकाळी 6.30 ते 9.30 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 10 ते 12 सकाळ सत्र कीर्तन, दुपारी 12 ते 2 भोजन, दररोज दुपारी 3 ते 5 हभप निवृत्ती महाराज वक्ते यांचे ताटीचे अभंगपर प्रवचने, संध्याकाळी 6 ते 8 व रात्री 8 ते 10 कीर्तन अशा भव्य कार्यक्रमाचे क्रमबद्ध नियोजन करुन आडविहीर, पाचपोर, नशिराबाद, हसेगाव, गोळेगाव, बार्शी, अंजाळे, भिवंडी, सखारामपुर, आळंदी, आपेगाव, दोंडाईचा, बारामती, पैठण येथील कीर्तनकारांची कीर्तने होणार आहे.

भाविकांची लक्षणिय उपस्थिती
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत मुक्ताबाई मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत काकडा आरती करण्यात आली. यानंतर ज्ञानेश्‍वरी पारायणास प्रारंभ करण्यात आला. यामध्ये संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीच्या माध्यमातून दिलेल्या गीतेचा संदेश सहभागी झालेल्या भाविकांना देण्यात येत आहे. तसेच परिसरातील महिला व पुरुष भाविकांची उपस्थिती लक्षणिय आहे.

लाभ घेण्याचे आवाहन
तरी या अलौकिक भव्य ज्ञानेश्वरी पारायण व राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील, सद्गुरू जोग महाराज शताब्दी महोत्सव सप्ताह समितीचे अध्यक्ष हभप संदीप महाराज खामणी, हभप रविंद्र महाराज हरणे, हभप उध्दव महाराज जुनारे यांनी केले आहे.